शेलूबाजार माध्यमिक आश्रमशाळेत स्नेहगंध 2023 कार्यक्रम संपन्न

       शेलूबाजार माध्यमिक आश्रमशाळेत

    स्नेहगंध 2023 कार्यक्रम संपन्न                                                               

       वाशिम, दि. 13 (जिमाका) : शेलूबाजर येथील आदिवासी विकास विभागाच्या माध्यमिक आश्रमशाळेत स्नेहगंध 2023 या कार्यक्रमाअंतर्गत विज्ञान, गणित, चित्रकला, रांगोळी व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन 11 जानेवारी रोजी करण्यात आले. उदघाटन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले. अध्यक्षस्थानी अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.

          उदघाटक म्हणून बोलतांना श्री. वानखेडे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेमध्ये शिकत असतांना आपल्या जीवनाचा मार्ग प्रशस्त करावा. केवळ शिक्षण यावरच लक्ष केंद्रीत करुन भविष्यात आपल्याला चांगल्या मोठया पदावर कसे जाता येईल. यादृष्टीने अभ्यासासोबतच स्पर्धा परिक्षेचे आतापासूनच तयारी ठेवावी. शिक्षकांकडून जास्तीत जास्‍त ज्ञान गृहण करावे. शालेय जीवनातूनच आपण आपल्या विकासाला चालना दयावी. गणीत आणि विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून भविष्यात चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न बघावे. प्रत्येक आदिवासी विद्यार्थी हा एक चांगला जबाबदार नागरीक कसा घडेल यादृष्टीने आश्रमशाळेतील शिक्षकांनी परिश्रम करावे. असे ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी विज्ञान, गणित, चित्रकला व रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले.

          श्री. खडसे म्हणाले, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असून त्यांच्यातील नेतृत्व विकासाला चालना मिळण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण केवळ इयत्ता 10 वी आणि 12 वी पर्यंतच मर्यादीत न ठेवता उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय बाळगून त्यादृष्टीने कठोर परिश्रम केले पाहिजे. असे ते म्हणाले.

          श्री. हिवाळे म्हणाले, स्नेहगंध या कार्यक्रमाच्या माध्यमातून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळत आहे. विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान या विषयाकडे विशेष लक्ष दयावे. त्यामुळे भविष्यात त्यांना चांगल्या प्रकारे विविध क्षेत्रात विकासाला वाव राहणार आहे. लवकरच या आश्रमशाळेच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल. चांगली जागा चिखलीजवळच रस्त्याच्या बाजूला उपलब्ध झाली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.एम. राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.      

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे