पदवीधर मतदारसंघ निवडणुक15 हजार 44 मतदार बजावणार मतदानाचा हक्क : 26 मतदान केंद्र आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
पदवीधर मतदारसंघ निवडणुक
15 हजार 44 मतदार बजावणार मतदानाचा हक्क : 26 मतदान केंद्र
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम, दि. 04 (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुक आयोगाने या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप महाजन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज 4 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.महाजन पुढे म्हणाले, 30 जानेवारी 2023 रोजी अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदान आणि 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 5 जानेवारी 2023 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. 12 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.यासाठी नोडल अधिकारी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार हे असतील.
जिल्हयातील अंतिम पदवीधर मतदारांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. मालेगांव तालुका - 1180 पुरुष, 247 स्त्री असे एकूण 1427 मतदार, रिसोड तालुका - 1874 पुरुष, 455 स्त्री असे एकूण 2329 मतदार, वाशिम तालुका - 3453 पुरुष, 1286 स्त्री एकूण 4739 मतदार, मंगरुळपीर तालुका - 1504 पुरुष, 510 स्त्री एकूण 2014 मतदार, कारंजा तालुका - 2335 पुरुष, 1227 स्त्री एकूण 3562 मतदार आणि मानोरा तालुक्यात 732 पुरुष, 241 स्त्री असे एकूण 973 मतदार आहे. जिल्हयात एकूण 11 हजार 78 पुरुष आणि 3 हजार 966 स्त्री असे एकूण 15 हजार 44 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी जिल्हयात एकूण 26 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार असल्याचे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment