अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक आदर्श आचार संहितेची यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी शहाजी पवार



अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक

आदर्श आचार संहितेची यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी

                                                                              शहाजी पवार

       वाशिम, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ अमरावती विभाग निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 29 डिसेंबर 2022 पासून या निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे निर्देश आदर्श आचार संहितेचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी दिले.

          आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हयातील यंत्रणांची या अनुषंगाने आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

          आचार संहितेच्या काळात काय करावे काय करु नये याबाबतच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. आचार संहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल असे नविन प्रकल्प, कार्यक्रम, कोणत्याही स्वरुपातील सवलती किंवा वित्तीय अनुदाने घोषित करण्यास किंवा त्याची आश्वासने देण्यात तसेच त्याची कोनशिला बसविण्यास मनाई करण्यात आली असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, शासकीय योजनांना नव्याने मंजूरी देता येत नाही. आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय व बांधकामे याकरीता नव्याने निधी देण्यात येऊ नये. तसेच बांधकामाचे कंत्राट देण्यात येऊ नये. आदर्श आचार संहिता अंमलात येण्यापूर्वी कामाचे आदेश देण्यात आले असले तरी जर क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नसेल तर असे कोणतेही काम सुरु करता येणार नाही. ही कामे निवडणूक प्रक्रीया पुर्ण केल्यानंतरच सुरु करता येतील. जर एखादे काम प्रत्यक्षात सुरु करण्यात आले असेल तर ते चालू ठेवता येऊ शकते. निवडणूक प्रचार कार्यासाठी शासकीय वाहनाचा वापर करता येणार नसल्याचे ते म्हणाले.

          श्री. पवार पुढे म्हणाले, निवडणूक घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत भारत निवडणूक आयोगाची तत्वे अंमलात आणावी. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदारांच्या जातीय समुह भावनांना आवाहन करु नये. पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टिका करण्यास परवानगी नाही. प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येणार नाही. ध्वनीवर्धकाचा वापर प्रचारासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सकाळी 6 पुर्वी व रात्री 10 नंतर करता येणार नाही.

         श्री. पवार म्हणाले, निवडणूकीच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर पुर्णत: बंदी राहील. आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये/सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करता येणार नाही. एखादया प्रशासकीय निकडीच्या कारणामुळे एखादया अधिकाऱ्याची बदली करणे आवश्यक वाटत असेल तर शासनाच्या संपूर्ण समर्थनासह व आयोगाची पूर्व मान्यता घ्यावी लागेल. तसेच आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करता येणार नाही. मतदान केंद्रावर मतदार वगळता निवडणूक आयोगाच्या वैध पासेस शिवाय कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्रात प्रवेश करता येणार नाही. उमेदवारांना किंवा त्यांच्या एजंटला निवडणूकीच्या संदर्भात काही विशिष्ट तक्रार किंवा समस्या असल्यास ते निवडणूक निरीक्षकांच्या निदर्शनास आणू शकतात. असे त्यांनी यावेळी सांगितले.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश