जलयुक्त शिवार अभियान, वृक्ष लागवड मोहिमेचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला आढावा



·         हरित सेना नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करा
वाशिम, दि. २६ : जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये प्रस्तावित जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांच्या अंदाजपत्रकांची सद्यस्थिती व १ ते ३१ जुलै २०१९ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अमरावतीचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानात सन २०१८-१९ मध्ये प्रस्तावित केलेल्या सर्व कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता मिळविण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी त्वरित पूर्ण करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी सबंधित यंत्रणा प्रमुखांनी घ्यावी. जिल्ह्यात यंदा भारतीय जैन संघटनेच्या सहयोगाने जलसंधारणाची कामे होणार आहेत. या कामांचे योग्य नियोजन होण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यशाळा झाला आहेत. त्यानुसार सर्व संबंधितांनी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात १०० मीटर बाय १०० मीटर बाय ३ मीटर आकाराची शेततळी प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही तळी पूर्ण करण्याच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वयाने काम करा
दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१९ दरम्यान होणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला प्राप्त ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.  सर्व संबंधित यंत्रणांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून त्यानुसार जागेची उपलब्धता व निवड करून वृक्ष लागवडीसाठी आतापासूनच पूर्व तयारी करावी. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, नदी क्षेत्रातही वृक्ष लागवड करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी दिल्या.
वृक्ष लागवडीसोबतच हरित सेनेमध्ये नाव नोंदणी करण्याच्या कामासही प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात यावर्षी ९० हजार हरित सेना सदस्यांची नोंदणी करावयाची आहे. हरित सेनेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, लोकप्रनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शिक्षक यांना सहभागी करून घ्यावे. हरित सेना सदस्य नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे