स्पर्धा परीक्षेच्या तयारीत ‘लोकराज्य’ उपयुक्त - नितीन मोहुर्ले
·
राजे
वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथे लोकराज्य वाचक मेळावा
वाशिम, दि.
११ : शासनाची
ध्येय-धोरणे, शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णयाची सविस्तर माहिती मिळण्याचा
अधिकृत स्त्रोत असलेले ‘लोकराज्य’ मासिक
हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे
प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय व राजे वाकाटक
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी आयोजित ‘लोकराज्य वाचक मेळावा’मध्ये
ते बोलत होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,
माहिती सहाय्यक तानाजी घोलप, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष
काळमुंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मोहुर्ले पुढे म्हणाले की, स्पर्धा
परीक्षेची तयारी करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित
केले पाहिजे. आपल्याला कोणत्या परीक्षेला सामोरे जायचे आहे, त्यासाठी कोणत्या
विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे हे ठरवून नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. स्पर्धा
परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे योग्य नियोजन, वाचन महत्वाचे आहे. परीक्षेच्या
अभ्यासक्रमानुसार ग्रंथवाचन करून स्वतःच्या नोट्स तयार करण्यावर भर द्या. इंटरनेट
सारख्या माध्यमाचाही योग्य पध्दतीने वापर करून, त्याद्वारे अधिकाधिक माहिती मिळवून
आपल्या नोट्स परिपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने
प्रकाशित होणारे ‘लोकराज्य’ हे शासनाचे मुखपत्र असल्याने यामध्ये असलेली माहिती
अधिकृत व अचूक असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीत चालू घडामोडींचा अभ्यास
करताना हे मासिक उपयुक्त ठरणारे आहे. तसेच आपल्याला शासनाच्या नवनवीन योजनांची
माहिती घेऊन त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा हे मासिक उपयुक्त असल्याचे श्री.
मोहुर्ले यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे यांनी
प्रास्ताविकामध्ये ‘लोकराज्य वाचक अभियान’विषयी माहिती दिली. ते म्हणाले, सर्वसामान्य
नागरिकांपर्यंत शासकीय योजना, शासन निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय याची माहिती
सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, या उद्देशाने ‘लोकराज्य’ मासिक प्रकाशित होते. प्रत्येक
महिन्याला वेगवेगळ्या विषयावर आधारित विशेषांक प्रकाशित करून त्या विषयाची सखोल,
सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न ‘लोकराज्य’च्या माध्यमातून केला जात आहे.
त्यामुळे ‘लोकराज्य’चा प्रत्येक अंक हा संग्रही आहे. हे मासिक प्रत्येक
घरा-घरापर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे
त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने सुरु
असलेल्या ‘युवा माहिती दूत’ अभियानाची माहिती देवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी
या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी उभारण्यात आलेल्या लोकराज्य विक्री
स्टॉलला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती
सहाय्यक तानाजी घोलप यांनी केले, तर आभार राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे गणेश
पाठक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे गजानन
इंगोले, विश्वनाथ मेरकर, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाच्या संगीता जोशी यांनी
परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment