विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी



·        संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा
·        महिला मतदार नोंदणीवर विशेष भर देण्याच्या सूचना
वाशिम, दि. २६ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक बूथवर नवीन मतदारांचे नाव नोंदणी, दुबार व मयत मतदारांचे नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी वाशिम तालुक्यातील सुपखेला, कळंबा महाली, ब्रह्मा व शेलू बु. या गावांमधील मतदान केंद्रांना भेट देवून पाहणी केली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश हांडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार बळवंत अरखराव, नायब तहसीलदार दीपक दंडे, मंडळ अधिकारी श्याम जोशी यांची उपस्थिती होते. श्री. सिंह यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आतापर्यंत झालेली नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे याबाबतची माहिती संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घेतली.
विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, आपल्या मतदान केंद्रांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार नोंदणीत येईल, विशेषतः कोणतीही महिला नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी घ्यावी. तसेच स्थलांतरित, दुबार व मयत मतदारांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुध्दा विहित कालावधीत पूर्ण करावी. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाविषयी सर्व बीएलओ यांनी घरोघरी जावून माहिती द्यावी. मतदान ओळखपत्रासाठी आवश्यक छायाचित्रांचे संकलन ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे