आरोग्यवर्धिनीच्या सेवेतून आरोग्याच्या चिंता दूर होणार - ना. प्रकाश जावडेकर
·
आसेगाव येथे
आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन
·
आरोग्यवर्धिनी
अंतर्गत १२ आरोग्य सेवांचा समावेश
वाशिम, दि. २२ : आजही
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर विविध सेवेत कमतरता राहिल्या आहेत. गरीब व मध्यम
वर्गातील लोकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. घराचा जर कोणी आजारी पडला तर
कुटुंबात अनेक अडचणी निर्माण होतात. प्रधामंत्र्यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या ‘आयुष्मान
भारत’ योजनेंतर्गत देशात दीड लाख आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु होणार असल्यामुळे
आरोग्यवर्धिनीच्या या सेवेतून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या चिंता दूर
होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी केले.
मंगरूळपीर
तालुक्यातील आसेगाव येथे ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या
आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांनी केले.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व
संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, भारत
सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा
परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.
जावडेकर म्हणाले, आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना
चांगल्या आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. देशातील १३० जिल्ह्ये जे विकासापासून दूर
आहेत, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम ‘आकांक्षित जिल्हा’ अभियानातून
करण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात ३९१ गावांत केंद्र शासनाच्या विविध
योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरगुती गॅस जोडणी,
वीज जोडणी, लसीकरण, विमा योजना, एलईडी बल्बचे वाटप, जनधन बँक खाते आदींचा लाभ
देण्यात आला आहे. या योजनेतून सरकार लाभार्थ्याच्या घरी पोहोचत आहे. अनेक योजनांची
प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्यासाठी मॉडेल डिग्री कॉलेज मंजूर करण्यात आले
आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध होणार
आहे. अनेक योजनांचा लाभ नागरिक घेत आहेत. केंद्र सरकारने पाठविलेला प्रत्येक पैसा
योजनेच्या स्वरुपात लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे.
आमदार
पाटणी म्हणाले, हा परिसर मागास आहे. इथले लोक मेहनत करून स्वबळावर उभे आहेत. या
भागातील नागरिकांचे आयुष्यमान वाढले पाहिजे, त्यासाठी आरोग्यवर्धिनीमध्ये या
प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. अनेक योजनांची जिल्ह्यात
प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्याच्या
विकासाला गती मिळाली आहे. अनेक ग्रामीण भागातील रस्ते या योजनेतून करण्यात येत
असल्यामुळे दळणवळणासाठी चांगली सुविधा निर्माण होत आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न
कमी असल्यामुळे जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सुद्धा कमी आहे. हा निर्देशांक
वाढला पाहिजे, यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी
सांगितले.
श्री.
ठाकरे म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यवर्धिनीच्या सेवेमुळे आसेगाव
परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार
आहे. या केंद्रात आता १२ आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी
सांगितले. प्रारंभी ना. प्रकाश जावडेकर यांनी फीत कापून आरोग्यवर्धिनी केंद्राचे
उद्घाटन केले. तसेच या केंद्रात असलेल्या विविध कक्षांची पाहणी करून रुग्णांची
आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास
सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी
नितीन मोहुर्ले, उप विभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख
अधिकारी व आसेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
संचालन व उपस्थितांचे आभार महेंद्र साबळे यांनी मानले.
Comments
Post a Comment