भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा देशवासियांना अभिमान - शैलेश हिंगे
· जिल्हाधिकारी
कार्यालयात ‘शौर्यदिन’ साजरा
·
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने
आयोजन
वाशिम, दि. २९ : भारतीय
सैनिकांनी २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय
सैन्याच्या या व अशा पराक्रमांचा देशवासियांना अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘शौर्यदिन’
कार्यक्रमात केले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश हांडे, जिल्हा सूचना व
विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, माजी सैनिक
संजय देशपांडे आदी उपस्थित होते. शहिदांच्या स्मृतीचिन्हास पुष्पांजली अर्पण करून
कार्यक्रमास सुरुवात झाली.
श्री. हिंगे म्हणाले की, भारतीय सैनिकांनी चीन, पाकिस्तान विरुध्द
झालेल्या युद्धांमध्ये अतुलनीय कामगिरी करून देशाचे नेहमीच संरक्षण केले आहे. दोन
वर्षांपूर्वी सीमेपार पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईकची केलेली कारवाई ही
अभिमानास्पद होती. या सैनिकांच्या या पराक्रमाचे स्मरण प्रत्येक नागरिकाने ठेवले
पाहिजे. देशाच्या संरक्षणाबरोबरच नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटातही आपले भारतीय
सैनिक देशबांधवांच्या मदतीला वेळोवेळी धावून येतात. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या
पूर संकटात सुध्दा सैनिकांनी अतिशय बिकट परीस्थित बचावकार्य करून नागरिकांना
वाचविल्याचे आपण पाहिले आहे. या सैनिकांच्या पराक्रमाला ‘शौर्यदिन’च्या निमित्ताने
सर्वांनी सलाम केला पाहिजे, असे श्री. हिंगे यावेळी म्हणाले.
श्री. देशपांडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
वीरपत्नी कलावती आंभोरे, शांताबाई सरकटे, पार्वती लहाने, मीराबाई
नागुलकर यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिकांचा व वीरपत्नींचा यावेळी सन्मान
करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रास्ताविक व संचालन
जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधीक्षक भागवत मापारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी नरेंद्र वाघमारे, रामधन राऊत, कोमलकर, रवींद्र डोंगरदिवे यांनी परिश्रम
घेतले.
Comments
Post a Comment