अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी १८ सप्टेंबर रोजी पेंशन अदालतीचे आयोजन


वाशिम, दि. ०७ : केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्यावतीने दि. १ जानेवारी २०१६ रोजी सेवानिवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन सुधारणेसंदर्भात संपूर्ण देशामधील संबंधित राज्य, केंद्र शासित प्रदेशामध्ये ‘पेंशन अदालत’चे आयोजन करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार दि. १८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ ते २ वा. दरम्यान मुंबई येथील मंत्रालय विस्तारित इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या आपले वेतन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास त्या संबंधित विभागास म्हणजेच भारतीय प्रशासन सेवामधील अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनी गृह विभाग, मंत्रालय, मुंबई येथे व भारतीय वन सेवामधील अधिकाऱ्यांनी महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे लेखी स्वरुपात ई-मेल अथवा फॅक्स अथवा पोस्टाने पाठवाव्यात. तसेच आपण अथवा आपला प्रतिनिधी यांनी आपल्या तक्रारीसह दि. १८ सप्टेंबर रोजी पेंशन अदालतमध्ये उपस्थित रहावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे