प्रत्येक घरात ‘लोकराज्य’ संग्रही असावे - प्रकाश राठोड





वाशिम, दि. ०६ : राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा प्रत्येक अंक हा अतिशय माहितीपूर्ण असतो. तसेच यामाध्यमातून आपल्याला शासनाची ध्येय-धोरणे, नवीन योजना याविषयी माहिती मिळण्यास मदत होत असल्याने प्रत्येक घरात ‘लोकराज्य’चा अंक संग्रही असला पाहिजे, असे मत जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रकाश राठोड यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित ‘लोकराज्य वाचक अभियान’ अंतर्गत वाचक मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे महासचिव प्रभाकर घुगे, संचालक डॉ. सितार्म नालेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. राठोड पुढे म्हणाले की, लोकराज्यमध्ये देण्यात येणारी माहिती ही अचूक व अधिकृत असते. तसेच शासन स्तरावर घेण्यात येणारे जनतेच्या हिताचे निर्णय या मासिकाच्या माध्यमातून प्रसिद्ध होतात. त्याचबरोबर विविध घडामोडींचे सखोल विश्लेषण याविषयीची माहिती मिळत असल्याने हे मासिक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. घुगे म्हणाले, वाचक अभियानाच्या माध्यमातून लोकराज्य मासिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून यामाध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील. यामाध्यमातून शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती व त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळाल्यास ते नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. नालेगावकर म्हणाले, लोकराज्य मासिक हे माहितीचा खजिना आहे. शासन स्तरावरील घडामोडींची एकत्रित माहिती, अचूक आकडेवारीसह विश्लेषणयामुळे लोकराज्य हे अतिशय माहितीपूर्ण मासिक बनले आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी सुध्दा लोकराज्य वाचनाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे यांनी लोकराज्य विषयी माहिती देताना सांगितले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित केले जाणारे लोकराज्य मासिक हे राज्य शासनाचे मुखपत्र आहे. यामाध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच जनतेच्या कल्याणासाठी राज्य शासन कोणती धोरणे आखत आहे, याबाबतची माहिती दिली जाते. वेगवेगळे विशेषांक काढून एखाद्या विषयाची सखोल माहिती लोकराज्यच्या माध्यमातून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेले महाराष्ट्र वार्षिकी २०१८ व महामानव ग्रंथांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी लावण्यात आलेल्या लोकराज्य विक्री स्टॉलला वाचकांचा प्रतिसाद लाभल. सूत्रसंचालन व आभार माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन इंगोले, विश्वनाथ मेरकर यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे