गणेशोत्सव, मोहरम काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायम मिश्रा

   
·        कायदा व सुव्यवस्था विषयक आढावा बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
वाशिमदि. ०३ : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून सुरु होत असलेला गणेशोत्सव व २० सप्टेंबर रोजी होणारा मोहरम सण शांततेत साजरे करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व समाजबांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. गणेशोत्सव व मोहरमच्या पृष्ठभूमीवर ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले की,गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही धार्मिक सण शांततेत साजरे करून त्यांचे पावित्र्य अबाधित राखावे. गणेशोत्सव काळात समाजप्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करावे. तसेच डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायतींनी तातडीने भरून घ्यावेत. तसेच या मार्गावर व विसर्जन स्थळी विद्युत दिवे बसवून पुरेशी विद्युत व्यवस्था करावी. वाशिम व इतर शहरांमध्ये विसर्जन स्थळी अग्निशमन दल व आरोग्य पथक तैनात करण्यात यावे.
नगरपरिषद क्षेत्रामधील विसर्जन मिरवणूक मार्ग व इतर संवेदनशिल ठिकाणी नगरपरिषदांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या मंडपमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देवून जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले की, गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभागपोलीस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची संयुक्त पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना पोलीस प्रशासनाकडून आलेले प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पोलीस अधीक्षक श्रीमती पाटील म्हणाल्या की, सण, उत्सव साजरे करताना कोणत्याही कायद्याचे, नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रस्त्यावर मंडप उभारणे, ध्वनीप्रदूषण करणे तसेच मिरवणुकांमध्ये सजावटीसाठी शस्त्रांचा वापर करणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारची कृती केल्यावर नाईलाजाने संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी लागते. त्यामुळे संबंधितांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवून विधायक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, वसंतराव धाडवे, नितीन उलेमाले, अब्रार मिर्झा,जुगलकिशोर कोठारी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोणतीही समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर नोंदवा
गणेशोत्सव व मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज होत आहे. उत्सव काळात कोणत्याही प्रकारची समस्या, अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा हेल्पलाईन क्रमांक १०७७ अथवा ई-लोकशाही कक्षाच्या ८३७९९२९४१५ या क्रमांकवरआपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे