खा. संजय धोत्रे, किशोर तिवारी यांनी घेतला पीक कर्ज, आरोग्यविषयक सेवांचा आढावा
·
पीक
कर्जाबाबत उदासीन बँक अधिकाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार
·
रब्बी
हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेसे पिक कर्ज द्या
वाशिम, दि.
१२ : खरीप
हंगामातील पीक कर्ज वाटप, कर्जमाफी व आरोग्य सेवेसंबंधी विविध प्रश्नांचा आढावा
घेण्यासाठी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय
धोत्रे व कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या
उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन
करण्यात आले. यावेळी खरीप पीक कर्ज वाटपातील संथगतीबाबत खा. धोत्रे व श्री. तिवारी
यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पीक कर्ज वाटपात उदासीनता दाखविणाऱ्या बँक
अधिकाऱ्यांचा अहवाल संबंधित बँकेच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याच्या सूचना
केल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी
शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक रमेश
कटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
अविनाश आहेर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, भारतीय स्टेट बँकेचे
क्षेत्रीय व्यवस्थापक सुनील मनचंदा, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. व्ही.
निनावकर यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. धोत्रे म्हणाले की, गतवर्षी
आलेल्या नैसर्गिक संकटामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली. त्यानंतर यंदा खरीप
हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे अपेक्षित होते. मात्र बँकांनी
अतिशय कमी प्रमाणात पीक कर्ज वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपाबाबत काही बँकांच्या
अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळाली
नसल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगामातील
पेरणीचे क्षेत्र वाढण्यासाठी शक्यता नाकारता येत आहे नाही. दि. १ ऑक्टोंबरपासून
रब्बी पीक कर्ज वाटप सुरु होणार असून पीक कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना
त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याची बँकांची जबाबदारी आहे. यामध्ये कुचराई होणार
नाही, याची दक्षता सर्व बँक अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनाही खा. धोत्रे यांनी
यावेळी दिल्या.
श्री. तिवारी म्हणाले की, खरीप पीक कर्ज
वाटपाबाबत जिल्हास्तराव सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा बँकांकडून अपेक्षित
प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. पीक कर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक
भूमिका घ्यावी. बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांसोबत सौजन्याने वागून त्यांना योग्य
माहिती द्यावी. बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याला व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने
कर्जमाफी व पीक कर्ज वितरणात अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारावर प्रतिबंध
म्हणून शेरा असलेल्या तसेच भोगवटदर वर्ग-२ च्या जमिनी संदर्भात काही बँका
उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना मागतात. मात्र शासनाने
अशाप्रकारे कोणतेही प्रमाणपत्र न घेण्याचे आदेश दिलेले असताना बँकांनी अशा प्रकारे
अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करण्याच्या सूचनाही श्री. तिवारी यांनी यावेळी
केल्या.
आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची
कार्यवाही तातडीने करा
जिल्ह्यातील
आरोग्य सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अनेक
अडचणी निर्माण होतात. लोकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे
जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने
करण्याच्या सूचना खासदार संजय धोत्रे व किशोर तिवारी यांनी दिल्या. तसेच सर्व
प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियुक्त असलेले अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर हजर
राहत नसतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक
आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा, असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
Comments
Post a Comment