राष्ट्रीय लोक अदालतीमुळे तंटे जलदगतीने निकाली निघणे शक्य - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे


·       राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३९८ प्रकरणांचा निपटारा
·       विविध प्रकरणांतील ९७ लक्ष रुपयांचे दावे निकाली
वाशिम, दि. ०८ :  न्यायालयात प्रलंबित असलेल्या तसेच दाखल न झालेल्या प्रकरणांचा जलद निपटारा होऊन तंटे जलदगतीने निकाली निघण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीमुळे मदत होत असून जास्तीत जास्त पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले तंटे, वाद सामोपचाराने सोडवावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांनी केले. वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाशिम जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, वकील, पक्षकार यांची उपस्थित होती.
श्री. जटाळे म्हणाले की, न्यायालयामध्ये दाखल झालेली तसेच दाखल होऊ शकणारी प्रकरणे सामोपचाराने सोडविण्याची संधी राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून वादाचे रूपांतरण संवादात होऊन तोडगा निघण्यास मदत होते. यामाध्यमातून प्रलंबित, दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा झाल्यास पक्षकार व न्यायालयाचा वेळ व पैशाची मोठी बचत होते. तसेच जलद व योग्य न्याय मिळण्यासाठीही लोक अदालत उपयुक्त ठरते. जास्तीत जास्त पक्षकारांनी लोक अदालतीच्या माध्यमातून आपले तंटे, वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय लोक अदालतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून पक्षकारांचे प्रबोधन केले. जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. अमर रेशवाल, अॅड. श्रद्धा अग्रवाल यांच्यासह अॅड. डी. डी. चव्हाण, अॅड. मनीष गिरडेकर, अॅड. आर. के. इंगोले, अॅड. अमोल सोमाणी, अॅड. पी. डी. लहाने, अॅड. एस. एस. भिंगारे, अॅड. ए. एस. बेलोकर, अॅड. डी. डी. देशमुख यांच्यासह इतर वकील, पॅनेल सदस्य यांनी प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.
३९८ प्रकरणांचा निपटारा; ९७ लक्ष रुपयांचे दावे निकाली
            राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण प्रकरणापैकी ३९८ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. निपटारा झालेल्या दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकांशी संबंधित १७ प्रकरणात ६ लक्ष २६ हजार १७२ रुपये, दूरध्वनी संबंधित ३९ प्रकरणांत ४९ हजार ३९० रुपये तर पाणीपट्टी संबंधी २ प्रकरणात १४ हजार २६८ रुपयांचे असे विविध एकूण ९७ लक्ष रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले.
*****
सोबत फोटो.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे