राज्य शासन, भारतीय जैन संघटनेच्या प्रयत्नांतून वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प







·       ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ अंतर्गत कार्यशाळा
·       भारतीय जैन संघटना देणार विनामूल्य मशीन; शासनाकडून मिळणार डीझेल
·       १५ जूनपर्यंत सुमारे दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट
·       जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक
वाशिम, दि. ०७ :  राज्य शासनचा मृद व जलसंधारणा विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आज जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित लोकप्रतिनिधी, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व शेतकरी यांच्या कार्यशाळेत करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी खासदार भावना गवळी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त दीपक सिंगला, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक शिखरचंद बागरेचा, निलेश सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतना श्रीमती देशमुख म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यात मोठे प्रकल्प नसल्याने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पावसावर अवलंबून रहावे लागते. ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’च्या माध्यमातून जिल्ह्यात होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यात शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. या अभियानातून होणाऱ्या कामांमध्ये सर्वांनी मतभेद विसरून सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
खासदार श्रीमती गवळी म्हणाल्या की, भारतीय जैन संघटनेमार्फत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या अभियानात त्यांनी वाशिम जिल्ह्याची निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अभियानात शेतकरी, नागरिकांनी सहभाग देवून आपल्या गावात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत. जलयुक्त शिवार अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे, त्याचप्रमाणे भारतीय जैन संघटना व शासनाच्यावतीने होणाऱ्या कामांचा लाभही मिळेल व पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
मृद व जलसंधारण विभागाचे सचिव श्री. डवले म्हणाले, राज्य शासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ हाती घेण्यात आले आहे. यामध्ये भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या कामासाठी मोफत जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून देणार असून यासाठी लागणारे डीझेल शासनामार्फत पुरविले जाणार आहे. तलावांमधील गाळ काढण्यासोबतच नाला खोलीकरण, मोठी तळी यासारखी कामे यामाध्यमातून केली जाणार आहेत. यामाध्यमातून जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे. याकरिता क्षेत्रभेटी देवून प्रत्यक्ष पाहणीद्वारे कामाची निवड, त्याचा आराखडा तयार करून कामांचे अंदाजपत्रक बनवून तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
सध्या पावसाळ्यामुळे तलावांमध्ये पाणी असल्याने गाळ उपसा करणे शक्य नसले तरी शासकीय मालकीच्या मोकळ्या जमिनींवर, वन जमिनींवर १०० मीटर बाय १०० मीटर बाय ३ मीटर आकाराची मोठी तळी खोदण्याचे काम करणे शक्य आहे. त्यादृष्टीने नियोजन करून लवकरात लवकर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी, असे श्री. डवले यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यात सुमारे दिड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. हे काम १५ जून २०१९ पूर्वी पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द काम करावे. तसेच जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या या कामांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवून हे अभियान लोकचळवळ बनविण्याचे आवाहन त्यांनी केले. या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयीचे तांत्रिक मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले.
भारतीय जैन संघटनेचे श्री. मुथा म्हणाले की, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत यावर्षी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत ३ महिन्यात सुमारे ६१ लक्ष क्युबिक मीटर गाळ उपसा करण्यात आल्याने बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल दुष्काळमुक्तीकडे सुरु आहे. त्याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात जलसंधारणाचे काम करून ते गाव जलपूर्ण बनविण्याचा प्रयत्न आहे. हे काम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून यामध्ये लोकसहभाग देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय जैन संघटनेने सन २०१३ पासून जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कामांची माहितीही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. गावसाने यांनी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’ अभियानाची माहिती दिली. तसेच या अभियानासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती दिली. बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, बुलडाणा पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता क्षितीजा गायकवाड, कृषि उपसंचालक मनोजकुमार, भारतीय जैन संघटनेचे बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी या अभियानाअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी केलेली पूर्वतयारी, सूक्ष्मनियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आलेले अनुभव याविषयी सादारीकरण केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी, जलसंधारण, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****
सोबत फोटो.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे