वाशिम मागास नसून विकासाची आकांक्षा करणारा जिल्हा - ना. प्रकाश जावडेकर
·
किन्हीराजा येथे
आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन
·
जिल्ह्यात पाच
आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित
·
१२ आरोग्य सेवांचा
समावेश
·
शेलूबाजार येथे मॉडेल
डिग्री कॉलेज
वाशिम, दि. २२ : पूर्वी प्राथमिक केंद्रांमध्ये आरोग्याच्या चांगल्या
सुविधा मिळत नव्हत्या. आता मात्र परिस्थिती बदलली असून आरोग्य सुविधेत वाढ झाली
आहे. आता हे आरोग्य केंद्रच नसून आरोग्यवर्धिनी केंद्र झाले आहे. वाशिम हा विकासात
मागे राहिला आहे. हा मागास जिल्हा नसून विकासाची आकांक्षा करणारा जिल्हा आहे, असे
प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
२२ सप्टेंबर रोजी मालेगाव
तालुक्यातील किन्हीराजा येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन श्री. जावडेकर
यांनी केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार
संजय धोत्रे, आमदार अमित झनक, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग
कार्पोरेशनचे संचालक तथा माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण
मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद
उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, पंचायत समिती सभापती छाया गवई उपस्थित होते.
श्री.
जावडेकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा
उपलब्ध व्हाव्यात, यासाठी देशात दीड लाख आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु होत आहेत. गावातल्या
गावात उपचार झाला पाहिजे, यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. आजपर्यंत कोणी
आजारी पडले तर आजारावरील उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत असायचा. त्यामुळे
कुटुंबाचे आर्थिक व मानसिक आरोग्य बिघडायचे. गरीब व मध्यम वर्गीयांना डोळ्यापुढे
ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील ५० कोटी नागरिकांना कधीही
रुग्णालयात जाण्याची वेळ आली तर पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत करण्याची
सुविधा ‘आयुष्मान भारत’ योजनेतून उपलब्ध करून दिली आहे. त्यामधून त्यांचा विमा
देखील काढण्यात येणार आहे. आजार बालावण्याच्या आधीच त्यावर उपचार करून रुग्णाला
बरे करण्यात येणार आहे. पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून या सेवेचा लाभ देण्यात येणार
आहे.
देशातील
११५ जिल्ह्यांचा समावेश ‘आकांक्षित जिल्हा’ या अभियानात करण्यात आला आहे. वाशिम
जिल्ह्याचा देखील या अभियानात समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात या अभियानामुळे मोठ्या
प्रमाणात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न
वाढविण्यासोबतच जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक देखील वाढण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात
दळणवळणाच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी ६ हजार कोटी रुपये रस्ते
विकासासाठी मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग जिल्ह्यातून जात
असल्यामुळे जिल्ह्याच्या समृद्धीला गती मिळणार आहे. चांगल्या शिक्षणाची सुविधा
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी शेलूबाजार येथे मॉडेल डिग्री
कॉलेज उभारण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून यासाठी १२ कोटी रुपये निधी
उपलब्ध करून दिला आहे.
खा.
धोत्रे म्हणाले की, अनेक क्रांतिकारी निर्णय वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र
व राज्य सरकारने घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे.
किन्हीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उच्च श्रेणीत रुपांतरण करून
आरोग्याच्या अधिक चांगल्या सुविधा आरोग्यवर्धिनी केंद्राची स्थापना करून उपलब्ध
करून देण्यात येणार आहेत. पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ प्रकारच्या आरोग्य
सेवा मिळत होत्या. आता आरोग्यवर्धिनीमुळे पाच नवीन सेवांचा समावेश झाल्यामुळे एकूण
१२ आरोग्यविषयक सेवा या केंद्रातून ग्रामीण भागातील नागरीकांना मिळणार आहेत. राष्ट्रीय
महामार्गावर हे गाव असल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता १०८ रुग्णवाहिकेची
सेवा येथे उपलब्ध होणार आहे. आता या केंद्रातून विविध प्रकारच्या कर्करोगाचे निदान
करून त्यावर उपचार सुध्दा करण्यात येणार आहेत. आरोग्य आणि शिक्षणाचे काम चांगले
झाले तर अनेक गोष्टींचा विकास चांगल्याप्रकारे होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
आ.
झनक म्हणाले, किन्हीराजा हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे
अपघातप्रसंगी जखमींना तातडीने उपचार
व्हावेत, यासाठी ट्रामा केअर सेंटर येथे सुरु झाले पाहिजे. १०८ रुग्णवाहिका या
केंद्राला उपलब्ध झाल्यास अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी
तातडीने अकोला, अमरावती, यवतमाळ येथे दाखल करता येईल, असे त्यांनी सांगितले.
आ.
पाटणी म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांचे सरासरी आयुष्यमान वाढले पाहिजे, त्याला
चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्राचा शुभारंभ करण्यात
आला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग जवळपास १०० किलोमीटर जिल्ह्यातून जात आहे. या
महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. आकांक्षित जिल्ह्यात वाशिम
जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्यामुळे अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून
अनेकांचे जीवनमान उंचावणार आहे. मॉडेल डिग्री कॉलेज जिल्ह्यासाठी मंजूर झाल्यामुळे
जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी आरोग्यवर्धिनी
केंद्राबाबतची विस्तृत माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास
सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी
नितीन मोहुर्ले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा ग्रामीण
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी
सुधाकर जिरोणकर, जिल्हा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकार, उपविभागीय
अधिकारी शरद जावळे, तहसीलदार राजेश वजीरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख
अधिकारी व किन्हीराजा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये मिळणार या १२ सुविधा –
·
गरोदर माता
तपासणी व प्रसृती सेवा
·
नवजात बालक
व अर्भक आरोग्य सेवा
·
बाल व
किशोरवयीन आरोग्य सेवा
·
कुटुंबकल्याण,
संतती प्रतिबंधक व प्रजनन आरोग्य सेवा
·
संसर्गजन्य
आजार उपचार सेवा
·
बाह्य
रुग्ण विभाग- सामान्य संसर्गजन्य व्याधी उपचार
·
असंसर्गजन्य
आजार तपासणी व उपचार
·
मानसिक
आजार तपासणी व प्राथमिक उपचार
·
नेत्ररोग व
कान, नाक, घसा प्राथमिक तपासणी
·
प्राथमिक
मौखिक आरोग्य तपासणी
·
वार्धक्य व
दुःख शामक काळजी सेवा
·
अत्यावश्यक
आरोग्य सेवा
Comments
Post a Comment