महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने वाशिमची ऐतिहासिक वाटचाल! 🌸महिला व बालविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवा; प्रत्येक गरजू महिला समाधानी होऊनच परतली पाहिजे– महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे



🌸 महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने वाशिमची ऐतिहासिक वाटचाल! 🌸

महिला व बालविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवा; प्रत्येक गरजू महिला समाधानी होऊनच परतली पाहिजे

– महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे

वाशिम शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या अहिल्याभवन (महिला व बालविकास भवन) चे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात लोकार्पण करण्यात आले. फीत कापून भवनाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी विविध कक्षांची पाहणी केली, उपलब्ध सुविधांची माहिती घेतली तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी बोलताना ना. तटकरे म्हणाल्या की, महिला व बालविकास भवन ही केवळ प्रशासकीय इमारत नसून महिलांच्या आशा, विश्वास आणि सक्षमीकरणाचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पीडित, गरजू व त्रस्त महिलेला तातडीने मदत, न्याय आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने कार्य करावे. प्रत्येक गरजू महिला समाधानी होऊनच या भवनातून परतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी 'बेटी बचाव, बेटी पढाओ' अभियान अधिक व्यापकपणे राबविणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, कुपोषणमुक्त जिल्हा घडविणे, महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, अंगणवाडी केंद्रांचे आधुनिकीकरण, आहार समित्या नियमितपणे कार्यरत ठेवणे आणि आदिशक्ती समित्यांचे काम अधिक प्रभावी करणे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिरकणी कक्ष तळमजल्यावर स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच माविमच्या माध्यमातून महिला बचतगट अधिक सक्षम करून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, महिला व बालविकास विभागाच्या विविध सेवा आता एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने महिलांना विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. या भवनामुळे सेवा वितरण अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होईल. जिल्हा प्रशासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून या वास्तूमधून लोकाभिमुख व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून दिली जाईल.

आमदार श्याम खोडे यांनी महिला व बालविकास भवनामुळे महिलांना विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळेल, तर आमदार किरणराव सरनाईक यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी 'बेटी बचाव, बेटी पढाओ' अभियानांतर्गत मुलगी जन्माला आलेल्या पाच कुटुंबांचा कन्या जन्म गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण, महिला बचतगटांच्या पतसंस्थांमार्फत कर्ज धनादेशांचे वाटप आणि परसबाग लागवडीसाठी बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार सईताई, विधानपरिषद सदस्य आमदार किरणराव सरनाईक, आमदार भावना गवळी, नगराध्यक्ष अनिल केंदळे, महिला व बालविकास आयुक्त वर्षा लढ्ढा, महिला व बालविकास उपायुक्त चौधरी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय बिरारी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले, माविमच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, महिला बचतगटांच्या सदस्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांना न्याय, संरक्षण, सन्मान, मार्गदर्शन आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे अहिल्याभवन हे वाशिम जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

#अहिल्याभवन #महिला_व_बालविकास #महिला_सक्षमीकरण #बेटीबचावबेटीपढाओ #वाशिम #शासनआपल्यादारी #महिला_कल्याण

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर