भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेयांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद



भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

·       वाशिम येथील नियोजन भवनात जिल्हयातील लाभार्थ्यांची उपस्थि‍ती


        वाशिम, दि. 31 (जिमाका) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमि‍त्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 31 मे रोजी हिमाचल प्रदेशातील सिमला येथून आयोजित कार्यक्रमातून देशातील लडाख या केंद्रशासीत प्रदेशासह बि‍हार, त्रिपुरा, कर्नाटक, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील केंद्र सरकारच्या 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन संवाद साधला.

          तत्पूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी देखील दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन संवाद साधला. वाशिम येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात थेट प्रसारित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पद्मश्री पुरस्कार प्राप्त नामदेव कांबळे, ज्येष्ठ साहित्यि‍क बाबाराव मुसळे, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंबि‍य, जिल्हा परिषद सदस्य व विविध यंत्रणांचे प्रमुख अधि‍कारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

           मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थि‍त होते. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मुंबई येथील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा व कुंजु पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

           मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे. प्रशासकीय यंत्रणांनी या योजनांसाठी गावपातळीवर काम करुन या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधान दिसत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, पोषण अभि‍यान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशनसह इतरही केंद्र सरकारच्या योजनांची राज्यात नियोजनबध्द अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगीतले.

          मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडीच्या मीरा कारंडे, लोणी (बु) चे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाच्या जिजाबाई पाटील, सांगरुळच्या लक्ष्मी साठे, अर्जुनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्हयातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणच्या मीरा पवार, नागपूर जिल्हयातील भंडारबोडीच्या मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीच्या संगीता निकम, औरंगाबाद जिल्हयातील रायपूरचे बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीच्या सुवर्णा भुईगळ यांनी मनोगत व्यक्त केले. वाशिम येथील नियोजन भवनाच्या सभागृहात केंद्र सरकारच्या 13 योजनांचे जिल्हयातील निवडक लाभार्थी व यंत्रणांचे कर्मचारी उपस्थित होते.  

          हिमाचल प्रदेशातील शिमला येथील कार्यक्रमातून श्री. मोदी यांनी लडाख या केंद्र शासीत प्रदेशातील श्री. ताशी, बिहार राज्यातील बांका जिल्हयातील श्रीमती ललीतादेवी, त्रिपुरा राज्यातील श्री. पंकज साहनी, कर्नाटक राज्यातील कलबुर्जी जिल्हयातील श्रीमती संतोषी, गुजरातमधील मैसाना जिल्हयातील श्री. अरविंदजी आणि हिमाचल प्रदेशातील सिन्नोर जिल्हयातील श्रीमती समादेवी यांचेशी संवाद साधला. मिळालेल्या योजनांच्या लाभाबाबत आपण समाधानी आहात काय, आणखी कोणत्या योजनांची आपल्याला आवश्यकता आहे. तसेच लाभार्थ्यांची कौटुंबिक माहिती श्री. मोदी यांनी जाणून घेतली. या कार्यक्रमाला हिमाचलचे राज्यापाल श्री. राजेंद्रजी, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

               श्री. मोदी म्हणाले, देशातील 130 कोटी जनतेचा सेवक म्हणून मला काम करण्याची आपणी जी  संधी दिली त्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानतो. देशातील विविध घटकांच्या कल्याणासाठी जेवढे काम करता येईल. तेवढे काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आपण सर्वजण मिळून भारताला अशा उंचीवर पोहचवू ज्याचे स्वप्न भारताच्या स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्या स्वातंत्र्या सैनिकांनी बघीतले होते. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांचे कष्ट कमी केले आहे. आज प्रत्येक गरीबाला आयुषमान भारताचा आधार आहे. सेवा, सुशासन व गरीबांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांमुळे लोकांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगीतले.

            सरकार ही जनता जनार्दनाची सेवक असल्याचे सांगून श्री. मोदी म्हणाले, नागरीकांचे जीवन सहज सोपे कसे बनेल यासाठी काम करण्यात येत आहे. गरीबांच्या कल्याणासाठी आपण काम करीत आहोत. याचे उदाहरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिशीअरी ट्रान्सफर. डिबीटीच्या माध्यमातून 10 कोटी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात 21 हजार कोटी रुपये आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अकरावा हप्ता जमा करण्यात आला आहे. डिबीटीच्या माध्यमातून मागील आठ वर्षात 22 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. देशातील 45 कोटी गरीबांनी जनधन बँक खाते उघडल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला सिमला येथील नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.       

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे