अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांना तात्काळ ऑनलाईन सेवा मिळाव्यात श्री रामबाबू नरूकुल्ला

अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांना तात्काळ ऑनलाईन सेवा मिळाव्यात 

                  श्री रामबाबू नरूकुल्ला

 वाशिम दि.११(जिमाका) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे तात्काळ ऑनलाईन सेवा मिळण्यासाठी यंत्रणांनी काम करावे.अशी सूचना राज्य सेवा हक्क आयोगाचे अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.
       आज ११ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा सभेत श्री.नरुकुला बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          श्री नरुकुल्ला म्हणाले,या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीकडे यंत्रणांनी लक्ष देऊन तपासणी अहवाल नियमित जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा. आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.ज्या विभागाच्या योजनांचा संबंध नागरिकांशी येतो त्यांना चांगल्याप्रकारे ऑनलाइन सेवांचा लाभ मिळाला पाहिजे. ऑनलाइन सेवांबाबत नागरिकांना पूर्ण माहिती नाही.त्यामुळे संबंधित विभागांनी लोकांना योजनांची माहिती देऊन ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्याबाबत कळवावे,असे ते म्हणाले.
          चांगल्याप्रकारे ऑनलाईन सेवा देणाऱ्या अधिकार्‍यांचा निश्चित सन्मान करण्यात येईल असे सांगून श्री.नरुकुला म्हणाले,जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात.निश्चित केलेले शुल्क आपले सरकार सेवा केंद्राने आकारावे.  नागरिकांना चांगल्या सेवा देण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी सांगितले.
             जिल्हाधिकारी षण्मुगराजन  म्हणाले,ज्या सेवा-सुविधा संबंधित विभागाने ऑनलाइन केल्या आहेत त्या ऑनलाइन असाव्यात. ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे.ज्या विभागाच्या सुविधा कमी आहेत त्या त्वरित ऑनलाइन करण्यात याव्यात. ज्या विभागाच्या सेवा जास्त प्रमाणात आहेत त्या हळूहळू सर्वच ऑनलाइन करण्यात याव्यात. विभागांनी आपल्या ऑनलाइन सेवाबाबत जनजागृती करावी असे ते म्हणाले.   
          प्रास्ताविकातून श्री.हिंगे यांनी माहिती दिली.जिल्ह्यात २१ विभागाच्या ३१० सेवा ऑनलाईन आहे.जिल्ह्यातील २१ विभागाकडे ऑनलाइन सेवेसाठी २ लाख ७० हजार ५९९ अर्ज आले. त्यापैकी २ लाख ५४ हजार ८२८ जणांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.जिल्ह्यात ६०६ आपले सरकार सेवा केंद्र आहे. लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत देण्यात आलेल्या सेवांच्या वार्षिक अहवालाबाबतची तसेच आपले सरकार सेवा केंद्रामधील स्पर्धा टप्पा १ बाबतची माहिती श्री.हिंगे यांनी सादरीकरणातून दिली.या सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे