प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

वाशिम दि.३०(जिमाका) दारिद्रय रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील कष्टकरी गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या काळात शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीचे काम करावे लागते.प्रसूती झाल्यानंतर शारीरिक क्षमता नसताना देखील कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मजुरीकरीता तात्काळ कामावर जावे लागते. अशा गर्भवती महिला आणि स्तनदा माता कुपोषित राहून त्यांचे आणि त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.त्यामुळे प्रसंगी मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. गर्भवती महिला,स्तनदा माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून  लागू केली आहे.त्याच अनुषंगाने राज्य सरकारने ८ डिसेंबर २०१७ च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाद्वारे राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
          प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही लाभार्थी महिलेसाठी एक वेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जीवित बालकापुरतीच मर्यादित आहे. एकदाच या योजनेचा लाभ घेता येतो. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापूरताच लाभ एकदाच देता येतो. दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देता येत नाही.शासनाने निश्चित केलेल्या मान्यताप्राप्त संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
          लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात लाभाची रक्कम तीन हप्त्यात थेट जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस ५ हजार रुपये एवढी रक्कम आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेचा  १ हजार रुपयांचा पहिला हप्ता हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर, दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता हा किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आणि दोन हजार  रुपयांचा तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटीस बी किंवा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येतो.
        या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर महिला व तिच्या पतीचे आधार क्रमांक असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक आणि आधार संलग्न बँक अथवा पोस्ट खाते तसेच लेखी संमती पत्र असणे आवश्यक आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी अधिपरिचारिका ह्या पात्र लाभार्थ्याना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र १ अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारून हा अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका आरोग्य अधिकार्‍याकडे पाठविण्यात येतो. अर्ज परिपूर्ण भरण्याची जबाबदारी अधिपरीचारिकाची आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे जमा करण्यात येऊन संबंधित संकेतस्थळावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थ्याच्या अर्जाची माहिती भरण्यात येते. 
          राज्यस्तरावरून संगणक प्रणालीच्या माध्यमातून थेट लाभ संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो. नगरपालिका क्षेत्रात सुद्धा अधिपरीचारिका पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र १अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारून हा अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याकडे पाठवण्यात येतो. हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी हे अर्जातील माहिती तपासून तो अर्ज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात येतो. मुख्याधिकारी हे संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या अर्जाची माहिती भरतात.
          केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना ५ हजार रुपयांची लाभाची रक्कम ही तीन टप्प्यात लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. ही योजना केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. या योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य सरकारचा ४० टक्के हिस्सा आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे