" बेटी बचाओ बेटी पढाओ "जिल्हास्तरीय कृती समिती सभा संपन्न
" बेटी बचाओ बेटी पढाओ "
जिल्हास्तरीय कृती समिती सभा संपन्न
वाशिम दि.०९ (जिमाका) बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कृती समितीची सभा आज ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे उपजिल्हाधिकारी संदीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला समितीच्या सदस्य डॉ.अलका मकासरे,श्रीमती सोनाली ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी श्री डाबेराव, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांचे प्रतिनिधी चोंडकर,जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री.ढोले, यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्वश्री श्री.नायक, श्री.ननावरे,श्री.जाधव,श्री.लुंगे,श्रीमती कवठकर तसेच कारंजा,रिसोड व वाशिम तालुका आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) श्री. जोल्हे यांनी सादरीकरणातून बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची माहिती दिली.लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे आणि मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबाबत साथ देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील १०० जिल्ह्यात २१ फेब्रुवारी २०१५ पासून हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश असून सन २०११ च्या जनगणनेनुसार मुलींच्या जन्माचे प्रमाण जिल्ह्यात ८५९ इतके आहे. मागील पाच वर्षातील जिल्ह्यातील मुलीच्या जन्माचे प्रमाण सन २०१७-१८ मध्ये ९५३, सन २०१८-१९ मध्ये ९३१,सन २०१९-२० मध्ये ९२०,सन २०२०-२१ मध्ये ९४५ आणि सन २०२१-२२ या वर्षात ९१६ आहे. जिल्ह्यातील कारंजा तालुका - ८९७, रिसोड तालुका -९०९ आणि वाशिम तालुका - ८९२ असे सन २०१५ -१६ ते मार्च २०२२ या कालावधीत मुलीच्या जन्माचे प्रमाण असल्याची तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी मार्च २०२२ पर्यंत ८४ मुली पात्र असल्याचे श्री.जोल्हे यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुलीचा जन्मदराचे प्रमाण वाढावे यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी असे महाजन यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्राची नियमित आणि आकस्मिक जिल्हास्तरीय समितीने तपासणी करावी. बनावट ग्राहक पाठवून सोनोग्राफी केंद्रात गर्भलिंग तपासणी केली जाते काय याबाबतची खात्री करावी. वाशिम, रिसोड आणि कारंजा तालुक्यामध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत जनजागृती करावी. शासनमान्य गर्भपात केंद्राची देखील नियमित तपासणी करण्यात यावी. तसेच १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकाची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी अशा सूचना यावेळी श्री.महाजन यांनी केली.
Comments
Post a Comment