जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
वाशीम दि २७ ( जिमाका) जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन एस. यांनी आज २७ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन विविध वार्ड व रुग्णांच्या उपचार तसेच शस्त्रक्रियेच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या यंत्रसामुग्रीची देखील पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धर्मपाल खेडकर, भूलतज्ञ अनिल कावरखे व नेत्रतज्ञ डॉ. तांदूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला निती आयोगाच्या निधीतून मिळालेल्या सोनोग्राफी व लॅप्रोस्कोपी मशीनची, ९२ बेडच्या अतिदक्षता विभागाची,पोषण पुनर्वसन केंद्राची, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर,नेत्र शस्त्रक्रिया विभागाची तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या १० बेडच्या मॉडयुलर डायलिसिस युनिटची तसेच कोविडच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्माण केलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली.
जुनी सोनोग्राफी मशीन कारंजा उपजिल्हा रुग्णालयाला देऊन नवीन मशीन पूर्ण क्षमतेने वाशिम येथे कार्यान्वित करावी. भूलतज्ञसाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करण्यात यावे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी सन २०२२-२३ च्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ज्या यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे,त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवा. म्हणजे साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देता येईल असे श्री.षण्मुगराजन यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment