प्रकाशदादांचे अपुर्ण कार्य पुर्ण करणे हीच श्रध्दांजली -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

प्रकाशदादांचे अपुर्ण कार्य पुर्ण करणे हीच श्रध्दांजली

                                                                   -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

           वाशिम, दि. 10 (जिमाका) : आपल्या मतदारसंघातील माणसांच्या समस्या कशा सोडवायच्या, त्यांना मदत कशी करायची याबाबत सतत प्रकाशदादांच्या मनामध्ये विचारमंथन सुरु असायचे. कारंजा विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केले. प्रकाशदादांचे अपुर्ण कार्य पुर्ण करणे हीच त्यांना श्रध्दांजली असून यासाठी आपण सहकार्य करणार असल्याची भावना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

               कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आज 10 मे रोजी माजी आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात गृहमंत्री श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार अमित झनक, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, अमरावतीचे माजी महापौर विलास इंगोले व हाजी युसुफ पुंजानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

               कोरोना काळात अनेकांना मदतीसाठी प्रकाशदादांनी पुढाकार घेतल्याचे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, त्यांचे कार्य व त्यांच्या आठवणी यामधून आपल्याला तो अनुभव घेऊन पुढे जाता येईल. त्यांच्या कुटूंबाला राजकीय वारसा होता. त्यांचे वडील स्व. उत्तमराव डहाके हे स्वातंत्र्य सैनिक होते. आई छबुताई डहाके हया सुध्दा सार्वजनिक जीवनात होत्या. आपले जीवन उत्तम चालले असतांना देखील त्यांनी व्यक्तीगत अडचणी व प्रश्न कधी मांडले नाही. राजकारणातील सातत्य त्यांना मिळू शकले नाही. सातत्य मिळाले असते तर आजच्या पेक्षा मोठी कामगीरी प्रकाशदादांनी केली असती. कधी कोणाचा व्देष व तक्रार त्यांनी केली नाही. प्रकाशदादा हे स्पष्ट वक्ते होते. सामान्य माणसांचे प्रश्न सुटले पाहिजे ही भावना त्यांची होती. त्याच भुमिकेतून त्यांनी आयुष्यभर काम केले. कारंजा शहर व परिसरासाठी त्यांनी चांगले पर्यटनस्थळ विकसीत केल्याचे श्री. वळसे पाटील म्हणाले.

               एखादा शहराचा व जिल्हयाचा विकास करायचा असेल तर तेथील सामाजिक सलोखा उत्तम राहिला पाहिजे असे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, छोटया छोटया प्रश्नांवरुन समाजासमाजामध्ये संघर्ष होत राहिला तर त्यामधून शहर व जिल्हयाचे नुकसानच आहे. एकदा शहराचे नाव मागे पडले तर गुंतवणूकीसाठी आणि विकासासाठी त्या शहरात येण्यास लोक फारसे उत्सुक नसतात. कारंजा व वाशिमला पुढे न्यायचे असेल तर सामाजिक सलोखा उत्तम राखून विकासाचे नियोजन करुन प्रकाशदादांचे स्वप्न पुर्ण करता  येईल. समाजकारण जास्त करावे कारण समाजकारणातून माणसे घडत असल्याचे श्री. वळसे पाटील यांनी सांगीतले.

               श्री. कडू म्हणाले, प्रकाशदादा हे पक्षाचे नेतृत्व नव्हते. तर ते पक्षाबाहेरील नेतृत्व होते. ते स्पष्ट वक्ते होते. सामान्य माणसांप्रती त्यांना आस्था होती. कमी बोलणारा पण अधिक काम करणारा माणूस असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. प्रकशदादा तर आपल्यातुन निघुन गेले. त्यांचे दु:ख घेऊन आता चालणार नाही तर त्यांचे अपुर्ण राहिलेले काम पुढे घेऊन आपणाला जायचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

               यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार अमित झनक, आमदार अमोल मिटकरी, युसूफ पुंजानी, बाबाराव खडसे व कौस्तुभ डहाके यांनी देखील स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. 

               प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतिचित्राचे पुजन करण्यात आले. गुरुकुंज मोझरी येथील श्री. गोपाल सालोडकर व संचांनी स्व. डहाके यांना सगीतमय श्रध्दांजली सादर केली. उपस्थित नागरीकांनी देखील दोन मिनिटे उभे राहून स्व. प्रकाशदादा डहाकेंना अभिवादन केले. यावेळी नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार देवव्रत डहाके यांनी मानले.   

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे