१५ जूनपर्यंत ९० टक्के शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचे वितरण व्हावे षण्मुगराजन एस

१५ जूनपर्यंत ९० टक्के शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचे वितरण व्हावे  
                       षण्मुगराजन एस

खरीप पिक कर्ज वितरण आढावा 

वाशिम दि.०९ (जिमाका) येत्या खरीप हंगामात पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाही याची बँकांनी दक्षता घ्यावी.पावसाळ्यापूर्वी १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
         आज ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा घेताना श्री षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सरव्यवस्थापक श्री. सरनाईक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
           श्री.षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात सन २०२२-२३ च्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. कुठल्याही परिस्थितीत ९० टक्के शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खते घेण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. पीक कर्ज वाटपासाठी बॅंकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये मेळावे आयोजित करावे.ज्या बँकांचे पिक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे,त्यांनी पीक कर्ज वाटप करताना निर्धारित वेळेत संबंधित शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा. बँक शाखानी शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांना पीक कर्जासाठी १५ जून पूर्वी बँकेत येण्याबाबत कळवावे. शेतकऱ्यांना ज्या पिकाच्या लागवडीसाठी पीक कर्ज उपलब्ध झाले आहे त्याच पिकाची लागवड शेतकऱ्यांनी करावी. बँकांची दिशाभूल करून दुसऱ्याच पिकाची लागवड करून पीक कर्ज घेतले असल्याचे दिसून आल्यास अशा शेतकऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री निनावकर यांनी सन २०२२-२३ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ७५० शेतकऱ्यांना १०५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असल्याचे सांगितले.७ मेपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार ७८० शेतकऱ्यांना ५१५ कोटी ५४ लक्ष रुपये पीक कर्ज वाटप केले. मागील वर्षीच्या तुलनेत ८२ कोटी १२ लक्ष रुपयांचे जास्त पीक कर्ज ६ हजार ३६८ वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.    
           सभेला उपस्थित विविध बँकांचे जिल्हा समन्वयक आणि शाखा व्यवस्थापक यांनी आपल्या बँकेमार्फत आतापर्यंत केलेल्या पीक कर्ज वितरणाची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे