कोविड काळातील टाळेबंदीमुळे उपजीविकेवर परिणाम झालेल्या २२४८ पथविक्रेत्यांना मिळाला पीएम स्वनिधीचा आधार

कोविड काळातील टाळेबंदीमुळे 
उपजीविकेवर परिणाम झालेल्या २२४८ पथविक्रेत्यांना मिळाला पीएम स्वनिधीचा आधार

 वाशिम दि.२४ (जिमाका) कोरोना या जागतिक महामारीची साथ मार्च २०२० मध्ये सर्वत्र पसरायला सुरुवात झाली.या महामारीमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी टाळेबंदी लावण्यात आली.कोरोना सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमुळे शहरवासीयांना आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करून देणाऱ्या पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला.जे काही भांडवल त्यांच्याकडे होते ते सुद्धा टाळेबंदीमुळे शिल्लक राहिले नाही.अशा पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना खेळते भांडवलाचा तातडीने पतपुरवठा करण्यात आला तो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतील पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून.जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील २२४८ पथविक्रेत्यांना या योजनेतून प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले.त्यामुळे या पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मदत झाली.
                  शहरी भागात या पथविक्रेत्यांच्या माध्यमातून भाज्या,फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी, पाव,अंडी,कापड, वस्त्र,चप्पल, कारागिरांकडून उत्पादित वस्तू, पुस्तके,स्टेशनरी तसेच केस कर्तन दुकाने, चर्मकार,पानठेले, कपडे धुण्याचे व कपडे प्रेस करणाऱ्या व्यावसायिकांचा यामध्ये समावेश होतो. अशा व्यावसायिकांना या योजनेअंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. हे १० हजार रुपये कर्ज नियमितपणे परतफेड करण्यासाठी या पथ विक्रेत्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
          पीएम स्वनिधी योजनेचा जिल्ह्यातील वाशिम,रिसोड मंगरूळपीर,कारंजा,मानोरा व मालेगाव या नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील २६८० पथविक्रेत्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळपास ३०३१ अर्ज ऑनलाईन पद्धतीने संबंधित नगरपालिका/नगरपंचायतीला प्राप्त झाले.प्राप्त अर्जाची पडताळणी करुन २४९५ अर्ज मंजूर करण्यात आले.१६ एप्रिल २०२२ पर्यंत २२४८ पथविक्रेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे भांडवली कर्ज पीएम स्वनिधी योजनेतून देण्यात आले. यामध्ये वाशिम - ५२०, रिसोड -५९०, मंगरूळपीर - ३६७,कारंजा - ५३६, मालेगाव - १३९ आणि मानोरा नगर पंचायत क्षेत्रातील १०८ पथ विक्रेत्यांचा यामध्ये समावेश आहे.जिल्ह्याची ही टक्केवारी ८४ टक्के इतकी आहे.कर्जाची नियमित परतफेड करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारास त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.त्यामुळे कोरोना काळात पथविक्रेता म्हणून साहित्य व वस्तूची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांना पीएम स्वनिधी योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे