पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्ट पासबुकचे वितरण


पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना

स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्ट पासबुकचे वितरण

        वाशिम, दि. 30 (जिमाका) पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेचा शुभारंभ आज 30 मे रोजी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. मोदी यांनी कोविड संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, त्यांच्या पालनकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

           जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी, बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती अरुणा ताजने, अशोक ताजणे, ॲड. प्रकाश जोशी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले व विधी सल्लागार जिनसाजी चौधरी हे या कार्यक्रमात सहभागी होते.

           जिल्हयातील चार अनाथ बालकांना आमदार लखन मलिक व जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते प्रधानमंत्री मोदी यांचे स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्टाचे पासबुक वितरीत करण्यात आले. या बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन निधीतून प्रत्येकी 10 लक्ष रुपये मुदत ठेवीचे पोस्टाचे पासबुक देण्यात आले. हे पासबुक सदर बालक आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त नावाने आहे.

           आयुषमान भारत योजनेअंतर्गत या चार बालकांचा प्रत्येकी चार लक्ष रुपयांचा आरोग्य विमा काढून त्या बालकांना आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. या विम्याचा हप्ता पीएम केअर फंडातून भरण्यात येणार आहे. असे 15 लक्ष रुपयांचे प्रत्येकी चार बालकांना वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत बाल संरक्षण सेवा योजनेतून 1 एप्रिल 2022 पासून चार हजार रुपये महिना प्रती बालक याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे.

          अनाथ झालेले जे बालक इयत्ता 1 ली ते 12 वी दरम्यान शिक्षण घेत आहे त्या बालकांना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाकडून प्रत्येकी 20 हजार रुपये वार्षिक तर कौशल्यविषयक तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या बालकांना प्रत्येकी 50 हजार रूपये वार्ष‍िक स्वनाथ स्कॉलरशीप देण्यात येत आहे. तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्यात येणार असून त्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम पीएम केअर्समधून भरण्यात येणार आहे.

          वाशिम येथील केंद्रीय विद्यालयात तीन पात्र अनाथ बालकांना प्रवेश देण्याबाबत जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी निर्देश दिले आहे. त्या बालकांची शाळा प्रवेश फी ही देखील पीएम केअर्स मधून देण्यात येणार आहे.

           प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ज्या बालकांचे दोन्ही पालक कोरोना संसर्गामुळे मरण पावले अशा देशातील सर्व अनाथ बालकांना या कार्यक्रमातून संबोधि‍त केले. बालकांना संबोधि‍त करतांना श्री. मोदी म्हणाले, आपण एकटे नसून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपले ध्येयस्वप्न पूर्ण करण्यासाठी इतर सर्व मंत्रालये आपल्या सोबत आहेत. या अनाथ बालकांना आशीर्वाद देत पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.

          यावेळी योजनेची माहिती देणारी चित्रफि‍त दाखविण्यात आली. दिल्ली येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमास बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रा.पौर्णि‍मा संधानी, प्रा. डॉ. सुनिता राठोड, महिला व बालकल्याण विभागाचे रमेश वाघ व गोपाळ मोरे यांचीसुध्दा उपस्थिती होती.      

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे