व्हॉलीबॉलच्या कौशल्य वृध्दीचे मिळणार प्रशिक्षण गुणवंत खेळाडू मुलींचा शोध सुरु

 

व्हॉलीबॉलच्या कौशल्य वृध्दीचे मिळणार प्रशिक्षण

गुणवंत खेळाडू मुलींचा शोध सुरु

         वाशिम, दि. 17 (जिमाका) : व्हॉलीबॉल या खेळाबाबत कौशल्य वृध्दीचे मर्यादित कालावधीचे अत्युच्च प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण गुणवंत खेळाडू असलेल्या मुलींना देण्यात येणार आहे, त्यासाठी खेळाडू मुलींचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिमने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

            नुकतेच 22 एप्रिल ते 11 मे 2022 या कालावधीत मुलांसाठी 20 दिवसाचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाले. मुलींनासुध्दा अशाच प्रकारचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर व्हॉलीबॉलचे तामिळनाडू येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.

            व्हॉलीबॉल खेळासाठी मुली खेळाडूंचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावे. उंची 175 सेंमी. व त्यापुढे शाळेत शिक्षण घेत असल्याचा दाखला (बोनाफाईड) सोबत आणावा. जिल्हयात गावपातळीपासून असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, संस्थामधील खेळाडू तसेच सन 2019-20 मध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील खेळाडू या वयोगटामध्ये असल्यास व उंचीची अट पुर्ण करीत असल्यास त्यांना या प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी होता येईल.

            जिल्हयातील जास्तीत जास्त पाच खेळाडूंची निवड करण्यात येईल. त्यामध्ये एक-सेटर, दोन-अटॅकर आणि दोन युनिव्हर्सल/ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे/ खेळाडूंच्या खेळातील खेळण्याची जागा यानुसार असल्यास उत्तम राहील. खेळाडूंची उंची प्रत्यक्ष खात्री करुन पाठवावी. निकषानुसार उंची आढळून न आल्यास व पाठविण्यात आलेला खेळाडू हा व्हॉलीबॉल खेळाच्या सरावातील नसल्यास किंवा या खेळाशी निगडीत नसल्यास अशा खेळाडूला सहभागी करुन घेतले जाणार नाही. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या खेळाडूंनी पुन्हा अर्ज सादर करु नये.

            अधिक माहितीसाठी वाशिम येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व बालाजी शिरसीकर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे