एकबुर्जी प्रकल्पावर आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रात्यक्षिके


एकबुर्जी प्रकल्पावर आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रात्यक्षिके

वाशिम दि.१९(जिमाका) मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून आज १९ मे रोजी वाशीम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिमच्या वतीने पूर परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनाबाबतचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करण्यात आली. मानव सेवा विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजरद्वारा संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरचे जीवरक्षक दीपक सदाफळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून रबर बोटीच्या सहाय्याने पूरपरिस्थिती अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्याची प्रात्यक्षिके सादर केली. 
           यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक टवलारकर, नायब तहसीलदार श्री देवळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
               श्री सदाफळे यांनी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती दिली. पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर मानव व वित्तहानी वाचविणे गरजेचे आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात यंत्रणांना मदत करण्याची जबाबदारी ग्रामस्थांच्या असते. ग्रामस्थांच्या मदतीसाठी आपत्तीच्या काळात जेव्हा बचाव येतात, त्यांना मदत करणे ग्रामस्थांचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांनी आपत्तीच्या काळात आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
   या शिबिराला जिल्ह्यातील  उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय,पाटबंधारे विभाग, लघु सिंचन विभाग,वीज वितरण कंपनी, वन विभाग, जलसंपदा विभाग,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, होमगार्ड विभाग,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, श्री. बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी,नगरपालिका व नगरपंचायत कर्मचारी, सर्वधर्मसमभाव आपत्कालीन संस्था कारंजा, छत्रपती युवा मंडळ वाशिम, साळुंकाबाई महाविद्यालय वनोजा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, वाशिम तालुक्यातील उकळीपेन, रिसोड तालुक्यातील बाळखेड,चिचांबापेन, पेनबोरी,मंगरूपीर तालुक्यातील बोरव्हा(बु) येथील सरपंचपोलीस पाटील, तलाठी,ग्रामसेवक व या गावातील पोहणारे पाच व्यक्ती उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे विनोद मारवाडी, सागर बदामकर व सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे