बँकांनी मिशन मोडवर काम करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे* षण्मुगराजन एस.

*बँकांनी मिशन मोडवर काम करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे* 
               षण्मुगराजन एस.

 खरीप पीक कर्ज वाटप आढावा 

वाशिम दि.२४( जिमाका) यंदा मान्सूनचे आगमन लवकर होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळीच बियाणे व खते खरेदी करता यावे यासाठी बँकांनी मिशन मोडवर काम करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
               आज २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सन २०२२-२३ या वर्षातील खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा बँकांकडून घेताना श्री.षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर,अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य अधिकारी विनोद सरनाईक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक श्री.सरकटे तसेच राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे जिल्हा समन्वयक यांची उपस्थिती होती.
         श्री.षण्मुगराजन म्हणाले, बँकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास प्रोत्साहित करावे. मागील वर्षी जिल्ह्यातील बॅंकांनी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे ९० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे शासनाने यावर्षी अतिरिक्त १०० कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटपासाठी उपलब्ध करून दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत बॅंकांनी १५ जूनपर्यंत ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत बँकांनी दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले नाही अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाही याकडे बँकांनी विशेष लक्ष द्यावे. ज्या बॅंकांनी पीक कर्ज वाटपात चांगले काम केले आहे त्या बँका निश्चितपणे कौतुकासाठी पात्र आहेत. त्यांनी आपली पीक कर्ज वाटपात आपली कामगिरी उत्तम कशी राहील याकडे लक्ष द्यावे. बँकांतील रिक्त पदांच्या अडचणीबाबत अवगत करावे म्हणजे त्यांच्या प्रादेशिक कार्यालयाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवता येईल.असे श्री.षण्मुगराजन म्हणाले.
         श्री.निनावकर यांनी खरीप पीक कर्ज वाटपाबाबत माहिती दिली. सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लक्ष ८ हजार ७५० शेतकऱ्यांना ११५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट दिले आहे. २३ मे पर्यंत जिल्ह्यातील ६९ हजार ९४१ शेतकऱ्यांना ६११ कोटी १८ लक्ष रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. आतापर्यंत सर्वाधिक पीक कर्ज अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे.या बँकेने ५४ हजार १२० शेतकऱ्यांना ४४८ कोटी ५४ लक्ष रूपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ६ हजार ९२८ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५० लक्ष रुपये, बँक ऑफ इंडिया ९५४ शेतकऱ्यांना ९ कोटी २९ लक्ष रुपये, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने २९१० शेतकऱ्यांना २७  कोटी १३ लक्ष रुपये वाटप केले असून इतर राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी असून ह्या बँका कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची माहिती श्री.निनावकर यांनी यावेळी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे