जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ



वाशिम, दि. ०१ : सर्वसामान्य नागरिकासोबतच नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याबाबतची आस्था वाढत आहे. त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने दि. १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उत्तम फड, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, वन परिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, आकाश आहाळे आदी उपस्थित होते. वन्यजीव सप्ताहनिमित्ताने वन विभागाच्या वतीने विविध स्तरावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी श्री. वायाळ यांनी प्रस्ताविकात दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, प्रत्येक वन्यजीव हा निसर्ग व पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वन्यजीव रक्षणासाठी शासनाने विविध कायदे केले आहेत. या कायद्यांचे पालन करणे, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, वन्यजीव व वृक्षांच्या तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येवून प्रयत्न करावेत.
यावेळी उपस्थित असलेल्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी संवाद साधला. श्री. राठोड, श्री. चंदनशिव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री. नांदुरकर यांनी केले, तर आभार श्री. फड यांनी मानले. यावेळी बाकलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्लास्टिकचा वापर करी करून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश दिला. याठिकाणी आयोजित वन्यजीव, पक्षी छायाचित्र प्रदर्शनास यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.
जनजागृती रॅलीतून वन्यजीव रक्षणाचा संदेश
            वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु झालेली रॅली बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोस्ट ऑफिस चौक, फॉरेस्ट कॉलनी, तहसीलदार कार्यालयमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी वन्यजीवांच्या वेशभूषा व घोषणांच्या माध्यमातून वन्यजीव, पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या रॅलीमध्ये बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, शिवाजी हायस्कूल, जवाहर नवोदय विद्यालय व लॉयन्स विद्या निकेतनचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर