प्रत्येक क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा


वाशिम, दि. ३१ : प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम राबवितांना जिल्ह्यातील प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद शासकीय यंत्रणेकडे होणे व प्रत्येक क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे १२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम नियोजनबद्ध स्वरुपात राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये व इतर माध्यमातून माहिती संकलित करून क्षयरुग्णांचा शोध घ्यावा. तसेच प्रत्येक रुग्णाला नियमानुसार उपचार सुरु करून त्याला क्षयरोगमुक्त करावे. मोहिमेव्यतिरिक्त इतर माध्यमातून माहिती मिळालेल्या क्षयरुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून द्यावा. तसेच प्रत्येक क्षयरुग्ण व्यवस्थित औषधोपचार घेत आहे किंवा कसे, याबाबत नोंदी ठेवण्यात याव्यात. १२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घरी जावून रुग्णांची तपासणी करणे आवश्यक असून यामधून एकही घर सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
श्री. जिरोणकर यांनी यावेळी प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम कालावधीत ३५ हजार ४९ घरांना भेटी देण्यात येणार असून याकरिता ३०९ पथके तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश