गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करा - लक्ष्मीनारायण मिश्रा
वाशिम, दि. ३१ : नोव्हेंबर महिन्यात
राबविण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक
आहे. याकरिता आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या
समन्वयाने सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज
आयोजित गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते
बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अविनाश आहेर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी नितीन मोहुर्ले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा
क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.
व्ही. मेहकरकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
अंबादास मानकर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक तसेच संबंधित यंत्रणांचे
अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा
म्हणाले, गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ही
अतिशय महत्त्वपूर्ण मोहीम असून या मोहिमेची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी
होण्यासाठी महत्त्वाचा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील ९ महिने
ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुले, मुलींना लसीकरण करण्यात येणार असून याकरिता सर्व
अंगणवाडी, शाळा, विद्यालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक
पथके, वाहन व्यवस्था, लस पुरवठा व साठवण व्यवस्था याचे दिवसनिहाय नियोजन याचा
समावेश असलेला सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून तो जिल्हास्तरावर उपलब्ध करावा.
लसीकरण
पथकामध्ये समाविष्ट असलेले कर्मचारी तसेच त्यांचे पर्यवेक्षण करणाऱ्या
अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक याची माहिती सुध्दा जिल्हास्तरीय समन्वय
समितीमधील सदस्यांना उपलब्ध करून द्यावी. लसीकरण काळात कोणत्याही प्रकारचा
हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध मनुष्यबळ, वाहन व्यवस्था
व इतर सामुग्रीचे योग्य नियोजन करावे. सर्व शाळा, अंगणवाडी, विद्यालयातील प्रत्येक
विद्यार्थ्याला लस दिली जाईल, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी
दिल्या.
डॉ.
आहेर यांनी सांगितले की, जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील अंदाजित ३ लक्ष
९ हजार ८३१ मुलांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील
सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाविषयी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत
असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात येत
आहे.
*****
Comments
Post a Comment