मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
·
जिल्ह्यातील
मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा
·
महाराष्ट्र हरित
सेनेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या
·
पोक्सो कायदा,
बालविवाह प्रतिबंधक कायदाविषयी जनजागृती करा
वाशिम, दि. १६ : मतदार
यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन
मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे. या
मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील वयाची १८ वर्षे पूर्ण
केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक असून
याकरिता संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मतदार साक्षरता क्लबच्या
माध्यमातून या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. नियोजन भवन येथे १६ ऑक्टोंबर रोजी आयोजित जिल्ह्यातील
सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री
दुतोंडे, सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उत्तम फड, महिला व बाल विकास
अधिकारी सुभाष राठोड, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नवीन
मतदार नोंदणी, महाराष्ट्र हरित सेना नोंदणी यासह पोक्सो कायदा व बालविवाह
प्रतिबंधक कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी
श्री. मिश्रा म्हणाले, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव
मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात
नवीन मतदार नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १२ हजार नवीन मतदारांची नोंदणी
झाली असून उर्वरित सर्व पात्र उमेदवारांची नावे मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी
विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये
शिक्षण घेत असलेल्या व वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव
मतदार यादीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित प्राचार्यांनी महाविद्यालयामध्ये
स्थापन करण्यात आलेल्या मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मतदार
नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
वाहतूक
नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः महाविद्यालयात
शिक्षण घेणारे अनेक अल्पवयीन विद्यार्थी तसेच वाहतूक परवाना नसलेले विद्यार्थी
सुध्दा दुचाकीचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाविषयी जनजागृती होणे आवश्यक असून याकरिता
महाविद्यालय स्तरावर असलेल्या परिवहन समितीने विविध उपक्रमांचे आयोजन करावे. तसेच
संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहतूक नियमांची माहिती देवून या नियमांचे
उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेची माहिती द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी
यावेळी केल्या.
बालविवाह
प्रतिबंधक कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) विषयी सर्व शाळा व
महाविद्यालयांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. या कायद्यांचे स्वरूप व त्याचे
उल्लंघन केल्यास होणारी शिक्षा याविषयीचे फलक सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये लावले
जावेत. तसेच असे प्रकार घडत असल्यास त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावेत.
बालविवाह रोखण्यासाठी सुद्धा सर्व शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती दुतोंडे यांनी वाहतूक नियमांविषयी तर महिला व
बालविकास अधिकारी श्री. राठोड यांनी पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक
कायद्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी चमूने मतदार
नोंदणी व मतदार जागृतीविषयी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल काळे
यांनी केले.
हरित सेनेमध्ये
प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी करण्याचे आवाहन
पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी राज्य
शासनाने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरण रक्षणाच्या या कामात सर्वांचा
सहभाग आवश्यक आहे. याकरिता सर्व विद्यार्थ्यांची महाराष्ट्र हरित सेनेमध्ये नोंदणी
होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्या शाळा,
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हरित सेनेमध्ये नोंदणी करावी, अशा सूचना
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केल्या. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक श्री.
वायाळ व श्री. नांदूरकर यांनी हरितसेना नोंदणीविषयी सविस्तर माहिती दिली.
*****
Comments
Post a Comment