‘सुजलाम सुफलाम वाशिम’च्या माध्यमातून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याची संधी - आमदार राजेंद्र पाटणी
·
सर्व
शासकीय यंत्रणांनी ‘मिशन मोड’ काम करावे
·
जिल्ह्यात
जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे पूर्ण करा
वाशिम, दि. ०१ : राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना
(बीजेएस) यांच्या सामंजस्य करारातून वाशिम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियान
राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याची संधी
चालून आली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी शासकीय यंत्रणा व नागरिकांनी एकजुटीने
काम करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी आज केले. जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित ‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उप वन संरक्षक श्री.
वळवी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी शरद
जावळे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोळंकी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी
जाधव, प्रशांत बोरसे, श्री. चौधरी, बीजेएसचे शिखरचंद बागरेचा, निलेश सोमाणी यांच्यासह
विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
आ. पाटणी म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून जिल्ह्यात
जास्त जलसंधारणाची कामे करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून आवश्यक
तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. जिल्ह्यातील
शासकीय जमिनींवर लहान-मोठी शेततळी, सीसीटी व डीप सीसीटीची कामे करावीत. प्रत्येक
तालुक्यातील किमान ३० मोठी शेततळी करण्याचे नियोजन करावे. या माध्यमातून गावांमध्ये
छोटे-छोटे जलस्त्रोत निर्माण होऊन जलपुनर्भरण होण्यास मदत होईल. या अभियानाच्या
माध्यमातून जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व जिल्ह्यातील सर्व सिंचन
प्रकल्पांमधील गाळ काढण्याची कामे प्रस्तावित करावीत. जिल्ह्यातील दुष्काळ दूर
करण्यासाठी भारतीय जैन संघटना, जिल्हा प्रशासन व सर्व नागरिकांनी एकत्रित प्रयत्न
केल्यास निश्चितच त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी
यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, भारतीय जैन संघटनाच्या माध्यमातून
होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांविषयी सर्व यंत्रणांना वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार
कामांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही लवकरात
लवकर होणे आवश्यक आहे. या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी
संबंधित यंत्रणा प्रमुखांनी घ्यावी. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक
शक्य ठिकाणी जलसंधारणाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामाध्यमातून जिल्ह्याची
सिंचन क्षमता वाढण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
******
सोबत फोटो.
Comments
Post a Comment