रस्ते अपघातग्रस्तांना मोठा दिलासा ‘पीएम राहत योजना’ ठरणार जीवदान देणारी गोल्डन अवरमध्ये मोफत उपचारासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना


विशेष वृत्त 

रस्ते अपघातग्रस्तांना मोठा दिलासा 

 ‘पीएम राहत योजना’ ठरणार जीवदान देणारी

गोल्डन अवरमध्ये मोफत उपचारासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

वाशिम, दि. ४ जुन (जिमाका) वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी केंद्र शासनाने ‘पीएम राहत योजना’ सुरू केली आहे.

 या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीचे व रोखरहित उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. 

 अपघातानंतरच्या पहिल्या एका तासात योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास सुमारे ५० टक्के मृत्यू टाळता येऊ शकतात. याच उद्देशाने मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, २०१९ च्या कलम १६२ नुसार ही योजना राबविण्यात येत आहे. 

योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना कमाल १.५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचा लाभ मिळणार असून अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत उपचार खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. रुग्णाला अपघातानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असून पोलीस यंत्रणेकडून अपघाताची पुष्टी निश्चित कालावधीत केली जाणार आहे. 

योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ई-डिटेल्ड अॅक्सिडेंट रिपोर्ट आणि ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टम २.० यांच्या माध्यमातून अपघात नोंदणी, उपचार व दावा निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. तसेच ११२ आपत्कालीन सेवा, सीसीटीएनएस प्रणाली आणि एसएमएस सूचनांची जोड देण्यात आली आहे. 

योजनेच्या अंमलबजावणीत अपघातग्रस्त, त्यांचे कुटुंबीय, गुड समॅरिटन, पोलीस, रुग्णालये, जनरल इन्शुरन्स कौन्सिल तसेच जिल्हाधिकारी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. विमाधारक वाहनांच्या प्रकरणांमध्ये जनरल इन्शुरन्स कौन्सिलमार्फत तर अविमाधारक प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दावे निकाली काढले जाणार आहेत. 

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १६२ नुसार केंद्र सरकारने गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना रोखरहित उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तयार केली असून त्यासाठी ‘मोटार वाहन अपघात निधी’ची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून अपघातग्रस्तांच्या उपचारांचा खर्च भागविण्यात येणार आहे. 

रस्ते अपघातानंतर वेळेवर उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा व या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.