जिल्ह्यात मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान राबविण्यात येणार ..किडनी विकारांविरुद्धची आरोग्यदायी चळवळ...वेळेवर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीद्वारे नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाचा संकल्प


विशेष वृत्त

जिल्ह्यात मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान राबविण्यात येणार 

किडनी विकारांविरुद्धची आरोग्यदायी चळवळ

वेळेवर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीद्वारे नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाचा संकल्प

वाशिम,दि.९ जुन (जिमाका) आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असताना किडनीच्या दीर्घकालीन आजारांचे (CKD) संकटही गंभीर होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नसल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये विकार उशिरा निदर्शनास येतो आणि उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुंबई कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान’ हे जनसामान्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात किडनीच्या दीर्घकालीन आजारांच्या तपासणीचे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांची किडनीविषयक तपासणी, जोखीम असलेल्या व्यक्तींची ओळख, आजारांचे प्रारंभिक निदान, आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

किडनीचे विकार वाढण्यामागे मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, धूम्रपान, अपुरी पाण्याची मात्रा आणि अनियमित जीवनशैली ही प्रमुख कारणे मानली जातात. अनेकदा आजाराची लक्षणे गंभीर झाल्यानंतरच रुग्ण वैद्यकीय उपचारांकडे वळतात. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि जनजागृती हेच या आजारावरील प्रभावी शस्त्र मानले जाते. मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान याच उद्देशाने नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये किडनी विकारांची लक्षणे, तपासणी पद्धती, रुग्ण नोंदणी, संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण आणि जनजागृती उपक्रम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

अभियानाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला दिलेले प्राधान्य. आजार होण्यापूर्वीच नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचे काम या उपक्रमातून केले जाणार आहे. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे आणि मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व किडनी विकारांचे वेळेवर निदान आणि उपचाराची संधी उपलब्ध झाल्यास अनेक रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून गंभीर अवस्थेपर्यंत आजार पोहोचण्यापासून प्रतिबंध होणार आहे.

आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांचा सहभाग आवश्यक आहे. मुख्यमंत्री आरोग्यदीप अभियान हे याच लोकसहभागातून आरोग्य संरक्षणाचा नवा दीप प्रज्वलित करणारे अभियान ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर