मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत सर्वांनी पुढाकार घ्यावा !
🗳️ मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा !
लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेली मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी राबविण्यात येणारी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आणि मतदार यादीतील नोंदी अचूक राहणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी रवी काळे, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव तसेच जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जयेश खंडारे उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे, मतदार यादी अद्ययावतीकरण प्रक्रिया, नवमतदार नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती अर्ज, क्षेत्रीय पडताळणी, घरभेटी तसेच भारत निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याचे सखोल विवेचन केले.
प्रत्यक्ष कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, वेळेचे नियोजन आणि निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादीतील त्रुटी कमी करण्यासाठी काटेकोर पडताळणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले. पात्र मतदार वंचित राहणार नाहीत आणि अपात्र नावे यादीत राहणार नाहीत, यासाठी निवडणूक यंत्रणेने अत्यंत जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रशिक्षणामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक दिशा, माहिती आणि मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षणाला निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
✅ अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे.
✅ पात्र नागरिकांची नोंदणी आणि मतदार यादीचे शुद्धीकरण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
✅ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होऊन लोकशाही अधिक मजबूत करूया.
#विशेष_संक्षिप्त_पुनरीक्षण #SIR2026 #मतदारयादी #लोकशाही #Washim #ElectionCommission #VoterList #DistrictAdministrationWashim
Comments
Post a Comment