गटई कामगारांना अनुदानावर मिळणार लोखंडी पत्र्याचे स्टॉल
वाशिम, दि. १४ : चामड्याच्या
वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रातील अनुसूचित जातीमधील गटई कामगारांना १००
टक्के अनुदान तत्त्वावर लोखंडी पत्र्याचे स्टॉल व रोख ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याकरिता
जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक २५ जुलै २०१६ पर्यंत
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचे कार्यालयात सादर करावेत, असे समाज
कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त ए. एम. यावलीकर यांनी कळविले आहे.
चामड्याच्या
वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या
व्यक्ती आहेत. या व्यावसायिकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांची
आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात १०० टक्के शासकीय
अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल व रुपये ५०० इतके रोख अनुदान देण्याची
योजना शासनाने सुरु केली आहे. याकरिता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित
जातीमधील असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे
ग्रामीण भागात ४० हजार रुपये व शहरी भागात ५० हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे. याबाबतचा
तहसीलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. अजर्दार ज्या जागेत गटई स्टॉल मागत असेल
ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत
परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी किंवा त्यांच्या स्वमालकीची असावी.
योजनेचे
अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम
या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहतील. अर्जदारांनी याच
कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक २५ जुलै २०१६ पर्यंत सादर
करावा. उशिरा आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे समाज कल्याण
विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. यावलीकर यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment