जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामांना गती द्या - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील


·        जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक
·        सर्व कामांचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना
·        ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश
वाशिम, दि. ०७ : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्ह्यात सुरु असलेली सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे आमदार लखन मलिक, रिसोडचे आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक ए. एम. यावलीकर यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी खर्च करताना प्रत्येक विभागाने सुनियोजितपणे कामे पूर्ण करावीत. जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीसाठी निधी देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी समन्वयाने काम करून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना गती द्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाची माहिती पालकमंत्री डॉ. पाटील यांनी घेतली. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही इमारत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर यांनी यावेळी दिली.
कारंजा तालुक्यातील सावरगाव येथील रस्ता रखडल्याचा मुद्दा आमदार राजेंद्र पाटणी यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या रस्त्याचे काम सुरु करण्यामध्ये होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्ती केली. रस्त्याचे काम तातडीने मार्गी न लागल्यास याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कोणत्या विभागामुळे रस्त्याच्या कामात दिरंगाई झाली, याचा अहवाल सादर करावा, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. जिल्हा नियोजन योजनेतून निधी मिळालेली व अद्याप सुरु न झालेल्या, तसेच निर्माणाधीन असलेल्या रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह इतर विविध इमारतींच्या बांधकामांचा सद्यस्थिती अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी विविध विभागांनी सादर केलेल्या अनुपालन अहवालाचा व सन २०१५-१६, सन २०१६-१७ मधील निधी खर्चाचा आढावा घेतला.
सर्वप्रथम जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी मंजूर नियतव्यय व प्रत्यक्ष खर्चाची माहिती दिली. ते म्हणाले की, सन २०१५-१६ मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजना यामधून एकूण १९७ कोटी ३७ लक्ष ८३ हजार निधी प्राप्त झाला होता यापैकी १९७ कोटी ३६ लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला होता. यापैकी १९२ कोटी रुपये २७ लक्ष ४४ हजार रुपये म्हणजेच ९७.४२ टक्के निधी खर्च झाला. तसेच सन २०१६-१७ मध्ये १७८ कोटी ६२ लक्ष ६७ हजार रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. यापैकी १३६ कोटी ३९ लक्ष ९० हजार रुपये निधी प्राप्त झाला असून ४८ कोटी ६५ लक्ष २५ हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. 
ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या पांदन रस्ते, शेतरस्ते यासह इतर रस्त्यांवर खासगी व्यक्तींनी अतिक्रमणे केल्यामुळे शेतकऱ्यांसह इतर सर्वसामान्य नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा काही अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला. यावर बोलताना पालकमंत्री डॉ. पाटील यांनी खरीप हंगाम पार पडण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले. यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
कामरगाव उच्च माध्यमिक शाळेला पुरेसे शिक्षक द्या
कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील उच्च माध्यमिक शाळेसह जिल्ह्यातील इतर काही शाळेमध्ये पुरसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तेथे पट टिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक देणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे कामरगाव येथील उच्च माध्यमिक शाळेसह जिल्ह्यातील विद्याथी संख्या जास्त असलेल्या शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्या. शिक्षकाअभावी जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार नाही, याची दक्षता शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
जलयुक्त शिवार अभियानाच्या चित्रफितीचे सादरीकरण

जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांच्या ठिकाणी पावसामुळे पाणी जमा झाले आहे. याविषयीची चित्रफित जलयुक्त शिवार अभियान समितीच्यावतीने बनविण्यात आली आहे. यामध्ये विविध यंत्रणांनी जिल्ह्यात केलेल्या कामांपैकी काही निवडक कामांचा प्रातिनिधिक स्वरुपात समावेश करण्यात आहे.  या चित्रफितीचे आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सादरीकरण करण्यात आले. ही चित्रफित पाहिल्यानंतर उपस्थित सदस्यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे