शेततळे ठरणार पिकांसाठी वरदान...
‘मागेल
त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा लाभ घेऊन तोंडगाव (ता.
जि. वाशिम) येथील शेतकरी भानुदास भगवान गोटे यांची चार एकर जिरायती शेती असून
त्यांनी आपल्या शेतामध्ये २५ मीटर लांबी व
रुंदी तसेच ३ मीटर खोलीचे शेततळे बनविले आहे. पावसाळाच्या सुरुवातीलाच हे शेततळे
तुडुंब भरले असून त्यामुळे पावसाच्या खंड काळात हे शेततळे पिकांसाठी वरदान ठरणार
आहे.
वाशिम-हिंगोली
महामार्गलगत तोंडगाव हद्दीमध्ये भानुदास भगवान गोटे यांची चार एकर शेती आहे. मात्र
सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना केवळ सोयाबीन
व तूर यासारख्या खरीप पिकांचे उत्पादन घेता येत होते. पावसाच्या भरवशावरच खरीपातील
पिकांचे उत्पादन अवलंबून होते. त्यामुळे ज्यावर्षी समाधानकारक पाऊस होईल,
त्यावर्षी उत्पदान चांगले व पावसाने दडी मारली तर पीक वाया जाणार, हे समीकरण ठरलेलेच होते. सन २०१५ मध्येही
भानुदास गोटे यांनी सोयाबीन व तूर पेरली होती. मात्र पावसाने खंड दिल्याने व
सिंचनाची सुविधा नसल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा
परिणाम उत्पादनावर होऊन सोयाबीनपासून २० हजार रुपयांपर्यंतच उत्पन्न मिळाले. तूर
पीक पाण्याअभावी पूर्णपणे नष्ट झाले. पेरणी व मशागतीचा सुमारे ८ ते १० हजार रुपये
खर्च वजा करून ४ एकरमध्ये केवळ १० ते १२ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाल्याचे
भानुदास गोटे सांगतात. पावसाच्या खंड काळात एक किंवा दोनवेळा पिकांना पाणी मिळाले
असते, तरी हे उत्पन्न काही पटींनी वाढले असते, असेही त्यांनी सांगितले.
शेतीला
संरक्षित सिंचनाची सोय होण्यासाठी भानुदास गोटे यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून
शेततळे घेण्याचे ठरविले. त्यांना २५ मीटर लांबी व रुंदी तसेच ३ मीटर खोलीचे शेततळे
मंजूर करण्यात आले. दिनांक ३० मे २०१६ रोजी कृषी विभागामार्फत शेततळ्यासाठी
कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर दिनांक २ जून २०१६ पासून भानुदास गोटे यांनी
पोकलँडच्या सहाय्याने खोदकामास सुरुवात केली. मात्र एक मीटर खोलपर्यंत खोदकाम
केल्यानंतर कठीण लागल्यामुळे त्यांना ब्लास्टिंगच्या सहाय्याने हा खडक फोडावा
लागला. तरीही भानुदास गोटे यांनी अतंत्य चिकाटीने चारच दिवसांत हे शेततळे पूर्ण केले. जुलै महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात सुरु झालेल्या पावसानंतर हे शेततळे भरले असून यामध्ये सुमारे १४
लक्ष ५२ हजार लिटर पाणीसाठा झाला आहे.
भानुदास
गोटे यांनी सध्या चार एकरमध्ये सोयाबीन व तूर पेरली आहे. या पिकांना शेततळ्यातील
पाण्यामुळे स्प्रिंकलरद्वारे तीन वेळा सिंचन करता येईल. त्यामुळे पावसाने खंड दिला
तरी यंदा सोयाबीन व तुरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाही. चार एकरमध्ये
यावर्षी सोयाबीनचे किमान २० क्विंटल व तुरीचे किमान १२ क्विंटल उत्पन्न अपेक्षित
आहे. त्यामुळे सरासरी ३,५०० रुपये प्रतिक्विंटल दराप्रमाणे सोयाबीनपासून किमान
७०,००० रुपये व सरासरी ८,००० रुपये प्रतिक्विंटल दराप्रमाणे तुरीपासून किमान
९६,००० रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे भानुदास गोटे यांनी सांगितले.
भानुदास
गोटे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घ्यावा.
शेततळ्यामुळे शेतीसाठी संरक्षित सोय होत असल्यामुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात
मोठी वाढ होणार आहे. तसेच पावसाळ्यात या शेततळ्यातील पाण्यामुळे भूजल पातळीमध्ये
वाढ होण्यास मदत होईल, असे वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी
सांगितले.
-
तानाजी घोलप,
जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम
******
Comments
Post a Comment