पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


·         खरीप हंगामातील नऊ पिकांसाठी योजना लागू
·         ३१ जुलैपर्यंत विमा हप्ता भरणे आवश्यक
·         कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक
·         बिगर कर्जदार शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. १३ :  खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  या योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
जिल्ह्यातील खरीप भात, ज्वारी, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कर्जदार शेतकाऱ्यांना पिक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याच्या भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादीत ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असली तरी जिह्यातील सर्वच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २  वर्ष वगळून) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारिख ३१ जुलै २०१६ पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.
या नुकसानीलाही मिळणार भरपाई
पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. काढणी पश्चात झालेले नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान. याबाबींमुळे होणाऱ्या नुकसानीला पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे भरपाई मिळणार आहे.

पीकनिहाय पीक विमा योजनेच हप्ता खालीलप्रमाणे आहे-

पिकाचे नाव
विमा संरक्षित
रक्कम रु.(प्रति हेक्टर)
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पीक विमा हप्ता
सोयाबीन  
३६०००/-
७२०/-
कापूस
३६०००/-
१८००/-
तूर
२८०००/-
५६०/-
मुग
१८०००/-
३६०/-
खरीप ज्वारी
२४०००/-
४८०/-
उडीद
१८०००/-
३६०/-
तीळ
२२०००/-
४४०/-
भुईमुग
३००००/-
६००/-
भात
३९०००/-
७८०/-

******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे