मतदार यादीमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत नाव नोंदविण्याची संधी - उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे


वाशिम, दि. १८ :- जिल्ह्यात मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत राबविली जाणार आहे. त्यामुळे दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा नगर परिषद निवडणुक प्रक्रीयेचे नोडल अधिकारी सुनील कोरडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. याप्रसंगी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे उपस्थित होते.
श्री. कोरडे म्हणाले की, जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची कार्यवाही सुरु आहे. यासोबतच जिल्हाभर मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम राबविली जात आहे. दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पण मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसणाऱ्या नागरिकांची नावे या मोहिमेदरम्यान मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. तसेच मतदार ओळखपत्र बनविणे, नावामध्ये दुरुस्ती, मयत अथवा स्थलांतरित व्यक्ती, दुबार नोंदणी झालेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळणे आदीबाबींचा या मोहिमेत समावेश आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)च्या मदतीने किंवा तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रांमध्ये जावून नागरिकांना मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करणे किंवा वगळण्याची कार्यवाही करता येईल.
वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या महाविद्यालयीन युवक-युवतींचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांच्या प्राचार्यांचीही मदत घेतली जाणार आहे. मतदार याद्या अचूक व अद्ययावत बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी नागरिकांनीही याबाबत जागृत होऊन आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी. तसेच मतदार ओळखपत्रामधील छायाचित्र, नाव, पत्ता यामध्ये काही दुरुस्ती असल्यास आपल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कोरडे यांनी यावेळी केले.
*****

सोबत फोटो.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे