गरजू शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्या - किशोर तिवारी


·        खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा
·        जिल्हा प्रशासन, बँकांच्या कामगिरीचे कौतुक
·        पंतप्रधान पीक कर्ज मोहिमेत सहभाग वाढविण्याचे आवाहन
वाशिम, दि. १८ :- अद्यापही पीक कर्जाचा लाभ न घेतलेल्या पात्र गरजू शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एस. मेहता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व तहसीलदार, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ना. तिवारी म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील बँकांनी खरीप पीक कर्ज वितरणात चांगली कामगिरी केली आहे. मात्र अद्यापही काही बँकांच्या कर्ज वितरणाचे प्रमाण असमाधानकारक आहे. या बँकांनी दिनांक ३१ जुलै २०१६ पर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पात्र गरजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणीपूर्वी ७० टक्के पेक्षा अधिक पीक कर्जाचे वितरण पूर्ण करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन व बँकांनी केलेल्या या कामगिरीचे ना. तिवारी यांनी यावेळी कौतुक केले. तसेच यापुढेही गरजू पात्र शेतकऱ्याला बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा
यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्याकरित शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जुलै २०१६ पर्यंत विमा हप्त्याची रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व बँकांनी याकामी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना या योजनेची माहिती द्यावी. तसेच आपल्या बँकेमार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन ना. किशोर तिवारी यांनी यावेळी केले.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा : जिल्हाधिकारी
पंतप्रधान पीक विमा योजना ही सन २०१५-१६ मधील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून योजनेची जनजागृती करणे आवश्यक आहे. याकरिता सर्व तहसीलदारांनी तालुकास्तरावर संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने तलाठी व कृषी सहाय्यकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी दिल्या .
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश