‘प्रत्येक वृक्षाची जोपासना करणार, आमचा गाव वनयुक्त बनविणार’









·        भामदेवीतील सर्व ग्रामस्थांचा निर्धार
·        एकजूट होऊन केली २५०० रोपांची लागवड
·        वृक्षरोपणात प्रत्येक नागरिकाचा सक्रीय सहभाग
वाशिम, दि. ०१ प्रत्येक वर्षी एक तरी झाड लावून त्या रोपट्याची जोपासना करणार, आमचा गाव वनयुक्त बनविणार, असा निर्धार वाशिम जिल्ह्यातील भामदेवी (ता. कारंजा) या सुमारे २ हजार २७५ लोकसंख्येच्या गावातील ग्रामस्थांनी आज केला. निमित्त होते राज्य शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे. कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्ह्याचे पालक सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित ग्रामस्थांनी सुमारे २ हजार ५०० वृक्षांची लागवड केली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या २ कोटी रुपये विशेष निधीतून टंचाईग्रस्त गाव अशी ओळख असलेल्या भामदेवी गावामध्ये मृदा व जलसंधारणाची कामे सुरु आहेत. यामधून गावातील शासकीय मालकीच्या साडेसहा हेक्टर जमिनीवर समतल चर खोदण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकाराने या जमिनीवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून आपल्या नावाचे झाड स्वतःच्या हाताने लावण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी लोकसहभागातून वृक्षारोपणासाठी खड्डे तयार केले.
आज प्रत्यक्ष वृक्षारोपण मोहिमेसाठी गावातील नागरिक दुपारी १२ वाजता वृक्षारोपण स्थळी जमले. यावेळी सर्वांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड व वृक्षांची जोपासना करण्याची प्रतिज्ञा केली. यानंतर आमदार राजेंद्र पाटणी, पालक सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, सरपंच सुभाष मोहकार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले. यावेळी महिला, शाळकरी मुले, वृध्द नागरिक यांच्यासह युवक-युवतींनी सक्रीय सहभाग नोंदविला. वृक्षारोपणाप्रसंगी प्रत्येक झाडावर संबंधित व्यक्तीच्या नावाचा फीत लावण्यात आली होती.
यावेळी मार्दर्शन करताना आ. पाटणी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भामदेवीसाठी २ कोटी निधी देवून आपले कर्तव्य बजावले आहे. आता ग्रामस्थांनी एकत्र येवून शासन राबवीत असलेल्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच आज लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करावे. या झाडांसाठी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पालक सचिव नंदकुमार म्हणाले की, गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावातील प्रत्येक नागरिकाचे नावे एक झाड लावण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. प्रत्येक गावकऱ्यांनी आज स्वतःच्या नावे लावलेले झाड जागवून शासनाच्या वनयुक्त महाराष्ट्र बनविण्याच्या उपक्रमाला हातभार लावावा. यावेळी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे यांनी गावातील वृक्षारोपण मोहिमेची संकल्पना विषद केली.
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या नावेही एक-एक झाड
भामदेवीतील प्रत्येक नागरिकाच्या नावे एक झाड लावण्यात आल्यानंतर या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झालेले आमदार राजेंद्र पाटणी, पालक सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील यांच्या नावेही भामदेवी येथे एक-एक झाड लावण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे