वाशिम जिल्ह्यात ८२३ कोटी ४२ लक्ष रुपये पीक कर्जाचे वितरण

·        १ लक्ष ६ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ
·        पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश
·        खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाला आधार
वाशिमदि३१ :  गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बळीराजाचे अर्थकारण बिघडले होते. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना सन २०१६ च्या खरीप हंगामात मशागत, पेरणीकरिता मदतीचा हात देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला होता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ८२३ कोटी ४२ लक्ष रुपये पिक कर्ज स्वरुपात वितरीत करण्यात आले आहेत.
यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पेरणी खालील क्षेत्र वाढ होण्याचा अंदाज होता. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी जमिनीची मशागत करणे, बियाणे व खते खरेदी करण्याकरिता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक होते. यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मधील खरीप हंगामासाठी किमान ९५० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्हातील सर्व बँकांना शाखेच्या संख्येनुसार उद्दिष्ट देण्यात आले. तसेच पीक कर्जाचा लाभ घेण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे वेळोवेळी गरजू शेतकऱ्यांना आवाहन केले.
पीक कर्जाचा लाभ प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींचीही सक्रीय साथ मिळाली. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पीक कर्ज वितरणाचा वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक यांनीही आपल्या मतदारसंघामधील तालुक्यांमध्ये आढावा बैठक घेऊन पीक कर्ज वितरणाबाबत मार्गदर्शन केले. या तालुकास्तरीय सभांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे सुद्धा उपस्थित होते. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणींवर या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होऊन त्या अडचणी सोडविण्यात आल्या. त्यामुळेही पीक कर्ज वितरणास गती मिळाली.
दिनांक २९ जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील १ लक्ष ६ हजार ४७२ शेतकऱ्यांना ८२३ कोटी ४२ लक्ष रुपये पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये ६ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच पीक कर्ज घेतले आहे. पीक कर्ज वितरणात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६१ हजार ६४२ शेतकऱ्यांना ३६८ कोटी ५२ लक्ष रुपये पीक कर्ज दिले आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी ३० हजार ६६ शेतकऱ्यांना ३०५ कोटी ४ लक्ष, खासगी बँकांनी १ हजार ५३३ शेतकऱ्यांना २५ कोटी ११ लक्ष रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १० हजार ८४२ शेतकऱ्यांना १११ कोटी ५४ लक्ष रुपये पीक कर्ज स्वरुपात वितरीत केले आहेत. या पीक कर्जामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागत, पेरणी, बियाणे व खते खरेदीसाठी मदत मिळाली आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशामुळे सुटल्या शेतकऱ्यांच्या समस्या
पीक कर्ज मिळविताना बँकेमध्ये सादर करावयाच्या कागदपत्रांविषयी माहिती नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन-दोन कोतवालांची नियुक्ती करण्याचे व त्या कोतवालांचे नाव, संपर्क क्रमांक दर्शिवणारा फलक बँकेच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार बँकांमध्ये कोतवालांची नियुक्ती करण्यात आल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना येणाऱ्या समस्या तातडीने सुटण्यास मदत झाली.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
पीक कर्जाविषयी काही कोणतीही समस्या असल्यास संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्याने मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जामध्ये येणाऱ्या अडचणींवर तातडीने मात करणे शक्य झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी वेळोवेळी सर्व बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठका घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, यासाठी पाठपुरावा केला. तसेच प्रत्यक्ष काही बँकांना भेटी देवून पीक कर्ज घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना येणाऱ्या समस्यांची माहिती घेऊन त्याअनुषंगाने संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळण्यास मदत झाली.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे