शेतमालाची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करा

·        जिल्हा उपनिबंधक यांचे शेतकऱ्यांना आवाहन
·        फळे व भाजीपाला नियमन मुक्त
·        शेतमालावरील आडत खरेदीदाराकडून घेतली जाणार
वाशिम, दि. १५ :  कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्यात आला असून सर्व प्रकारच्या शेतमालावर शेतकऱ्यांकडून आडत वसुलीस बंदी घालण्यात आली आहे. ही आडत खरेदीदाराकडून वसूल करण्याचा अध्यादेश राज्य शासने दिनांक ५ जुलै २०१६ रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व त्या अंतर्गत असलेल्या उपबाजारांमध्ये फळे, भाजीपाला व शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांनी केले आहे.
फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्यात आला असून सर्व प्रकारच्या शेतमालावर शेतकऱ्यांकडून आडत वसुलीस बंदी घालण्याबाबतचा शासनाच्या अध्यादेशाला राज्यातील व्यापारी व आडते यांनी विरोध दर्शिविला होता. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील फळे, भाजीपाला व शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. त्याअनुषंगाने सर्व व्यापारी व आडते यांनी राज्य शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले होते.
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यापारी व आडते यांच्या दिनांक १४ जुलै २०१६ रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत शेतमालवरील आडत खरेदीदाराकडून घेण्याचे मान्य करण्यात आले. तसेच दिनांक १५ जुलै २०१६ पासून सर्व बाजार समित्यांमध्ये फळे, भाजीपाला व शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमित सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तरीही जे व्यापारी, आडते, खरेदीदार कृषी बाजार समितीमध्ये फळे, भाजीपाला व शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास सहकार्य करणार नाहीत, अशा व्यापारी, आडते, खरेदीदार यांच्यावर सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सूचना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली फळे, भाजीपाला व शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती व त्या अंतर्गत असलेल्या उपबाजारांमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे