अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना मिळणार दरमहा एक किलो तूरडाळ
राज्यात तूर डाळीचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील अंत्योदय अन्न योजना व बीपीएल मधील शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह १ किलो तूरडाळ १२० रूपये किलो दराने वितरित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचा लाभ राज्यातील 70 लाख 7 हजार 589 शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तूर डाळीचे दर वाढत आहेत. त्याचा सर्वसामान्य जनतेला भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तूरडाळ रास्त भावात उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तूरडाळ वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अंत्योदय अन्न योजनेतील 24 लाख 72 हजार 753 आणि बीपीएल मधील 45 लाख ३४ हजार 836 शिधापत्रिकाधारकांनाप्रतिमाह १२० रूपये किलो दराने एक किलो तूरडाळ ऑगस्ट ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत वितरित केली जाणार आहे. ही तूरडाळ एनसीडीईएक्स स्पॉट एक्स्जेंजमार्फत खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी 84.74कोटी रूपयांच्या भांडवली खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
------***-------
Comments
Post a Comment