हरभरा पिकाचे एकात्‍मीक किड व रोग व्‍यवस्‍थापन करा :कृषी विभागाचे आवाहन

हरभरा पिकाचे एकात्‍मीक किड व रोग व्‍यवस्‍थापन करा

कृषी विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 07 (जिमाका)  जिल्‍हयात २०२३-२४ या वर्षात सरासरीपेक्षा कमी म्‍हणजेच ६७०.७९ मि.मी. पाऊस झाल्‍यामुळे सरासरी पेरणी क्षेत्र ६० हजार ८४३ हेक्टर असून आजअखेर प्रत्‍यक्ष हरभरा पिकाची पेरणी ४२ हजार ३०९ हेक्‍टरवर झाली आहे. म्‍हणजेच सरासरी पेरणी क्षेत्राच्‍या ६९ टक्‍के झाली आहे. २५ नोव्‍हेंबर २०२३ पासुन जिल्‍हयात सतत ढगाळ वातावरण व कमी अधिक प्रमाणात पाऊस असल्‍यामुळे हरभरा पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. हरभरा पिकावर मुख्‍यतः मर रोग आढळुन येत आहे. फ्युजारियम ऑक्‍सीस्‍पोरीयम या बुरशीमुळे हा रोग येत असुन सुरुवातीला पाने पिवळी पडून कोमेजतात व शेंडे मलुल होऊन झाड हिरव्‍या अवस्‍थेत वाळते. मर रोगाचे नियंत्रणाकरीता ठोस उपाय नसला तरी प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणुन रोग प्रतिबंधक जातीचा वापर व पेरणीपुर्वी बियाण्‍यास टायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे बिजप्रक्रिया किंवा पेरणीनंतर लगेचच हेक्‍टरी १० किलो ट्रायकोडर्मा जमीनीत मिसळुन दिल्‍यास रोगाचा प्रसार होण्‍यास प्रतिबंध होऊ शकतो. तसेच मुळकुज हा रायझोक्‍टोनिया बटाटाकोला या बुरशीमुळे होणारा रोग आहे. रोपाची पाने पिवळी पडून रोपे कोमेजतात. रोप उपटुन पाहील्‍यास मुळे सडलेली दिसतातरोप सहजपणे निघुन येते. या रोगाच्या नियंत्रणाकरीता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे बिजप्रक्रिया करणे आवश्‍यक आहे.

हरभरा पिकावर येणाऱ्या मुख्‍य किडी व नियंत्रणाचे उपाय

घाटेअळी- ही किड बहुभक्षी असुन पुर्ण विकसित घाटेअळी पोपटी रंगाची आहे. शरीराच्‍या बाजुवर तुटक करडया रेषा आढळतात. सुरुवातीच्या काळात पानावरील आवरण खरडुन खातात, नंतर अळी कळया व फुले कुरतडुन खाते. पुर्ण वाढ झालेली अळी तोंडाकडील भाग घाटयात घालुन आतील दाणे खाते. एक अळी साधारणतः ३० ते ४० घाटयाचे नुकसान करते.

            व्‍यवस्‍थापन- सुरुवातीच्या काळात ५ टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी.  हेक्‍टरी २० पक्षी थांबे उभारावे. जास्‍त प्रादुर्भाव आढळुन आल्‍यास इमामोक्‍टीन बेन्‍झोएट ५ एस.जी., ३ ग्रॅम किंवा क्‍लोरॅनट्रेनिपॉल १८.५ एस.जी. २.५ मी.ली. १० लीटर पाण्‍यात घेऊन फवारावे.

            पिकाच्‍या आवश्‍यकतेनुसारच ओलित करावे. हरभरा पिकास जास्‍त पाणी झाल्यास किंवा पाणी साचुन राहील्‍यास मर रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता असते. पिकांमध्‍ये डवरणीनिंदणी करुन शेतात हवा खेळती ठेवल्‍यास पिकांची वाढ चांगली होते. हरभरा हे द्विदलवर्गीय पिक असल्‍यामुळे या पिकांच्या मुळावर गाठी असतात. त्‍यामुळे हवेतील नत्र शोषण करुन पिक स्‍वतःची गरज भागवित असल्‍यामुळे या पिकास युरीयामधून नत्र मात्रा देऊ नये. पिकांचे एकत्रित एकात्‍मीक अन्‍नद्रव्‍यकिड व रोग व्‍यवस्‍थापन करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश