लोक न्यायालयात एकाच दिवशी १ हजार १८९ प्रकरणे निकाली..लोक न्यायालयाने फुलला पती पत्नीचा संसार..४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८ रक्कमेची प्रकरणे निकाली
लोक न्यायालयात एकाच दिवशी १ हजार १८९ प्रकरणे निकाली
लोक न्यायालयाने फुलला पती पत्नीचा संसार
४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८ रक्कमेची प्रकरणे निकाली
वाशिम,दि.९ (जिमाका) आज शनिवार ९ डिसेंबर रोजी जिल्हयातील सर्व तालुका व जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व्ही.ए.टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखल पुर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.
आज आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात वाशिम जिल्हयामधील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकुण १ हजार ६ प्रकरणांचा तसेच दाखल पुर्व १८३ प्रकरणे असे एकुण १ हजार १८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व एकुण रुपये ४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८ रक्कमेचे प्रकरणे निकाली काढण्यात आली.राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये वकील संघाचे व जिल्हा पोलीस दलाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
*लोक न्यायालयाने फुलला पती पत्नीचा संसार*
पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला की ते नाते तुटण्याच्या दिशेने जाऊ लागते आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात आणले जाते. मात्र लग्नाची ही नाती संपुष्टात येऊ नयेत म्हणुन न्यायालयही शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट प्रयत्न करीत असते.या लोक अदालतमध्ये असेच विभक्त राहत असलेल्या दोन वैवाहिक वादाच्या प्रकणांमध्ये निलेश व वनिता आणि सुनिल व अनुसया ह्या पती पत्नी यांच्यात प्रेमाचा समेट घडवुन आणल्यामुळे त्यांनी एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला.यावेळी न्या.आर.पी. पांडे यांनी या दाम्पत्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करून त्यांच्या भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.लोक न्यायालयाव्दारे त्यांचा संसार फुलल्यामुळे त्यांच्या चेह-यावर हास्य उमटले.
Comments
Post a Comment