दुधाळ जनावरांचा पुरवठा व शेळी गट वाटप योजना. 15 डिसेंबरपर्यंत पशुपालकांनी ऑनलाईन अर्ज करावे
*दुधाळ जनावरांचा पुरवठा व शेळी गट वाटप योजना*
15 डिसेंबरपर्यंत पशुपालकांनी ऑनलाईन अर्ज करावे
वाशिम,दि.12 (जिमाका) जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सन 2023-24 वर्षासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून 12 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.हे अर्ज https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर गुगल प्ले स्टोअरमध्ये AH.MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जाणार आहे. लाभार्थ्यांची निवडसुध्दा ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येणार आहे.अर्ज करण्याचा कालावधी वाढवून 15 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आला आहे.
विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/नवबौध्द लाभार्थींना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा पुरवाठा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड झाल्यास एक महिन्याच्या आत 25 टक्के लाभार्थी हिस्सा 44 हजार 814 रुपये धनाकर्षाव्दारे भरावा लागेल.निवड झालेल्या या योजनेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना 2 दुधाळ जनावरे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गुरांच्या बाजारातून खरेदी करुन देण्यात येतील.
विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौध्द लाभार्थींना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 10 शेळया व 1 बोकुड शेळीगटाचा पुरवठा करण्यात येईल.यामध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यास एक महिन्याच्या आत उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या शेळीसाठी 25 हजार 886 रुपये व स्थानिक शेळीच्या जातीसाठी 19 हजार 558 रुपये लाभार्थी हिस्सा धनाकर्षाव्दारे भरावा लागेल.शेळी गटाची खरेदी ही प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून करण्यात येईल.
या योजनांचे अर्ज करण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.याचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त गरजू पशुपालक लाभार्थ्यांनी घ्यावा.असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.व्ही. देशमुख यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment