आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पथके तैनात - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
·
जिल्हा संपर्क कक्ष, तक्रार निवारण
कक्ष स्थापन
·
मतदार यादीत नाव नोंदविण्याच अजूनही
संधी
·
‘सी व्हीजील’द्वारे करता येणार ऑनलाईन
तक्रार
वाशिम, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
केला असून आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया
सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक
सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी
उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनधी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. मोडक म्हणाले, विधान्साभास सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी
प्रसिद्ध करण्यात येणार असून ४ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. ५
ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची
अंतिम मुदत ७ ऑक्टोंबर पर्यंत आहे. २१ ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून
२४ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होईल. २७ ऑक्टोंबर पर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण
करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात
एकूण ४ लाख ५५ हजार ३८० महिला मतदार, ४ लाख ९८ हजार ३५२ पुरुष मतदार व इतर १० मतदार असे एकूण ९ लाख ५३ हजार ७४२ मतदार
आहेत. ज्यांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव
नोंदविलेले नाही, अशा व्यक्तींना २५ सप्टेंबरपर्यंत मतदार यादीमध्ये आपले नाव
नोंदविण्याची संधी आहे. तरी जिल्ह्यातील १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवक-युवती,
महिलांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक
यांनी यावेळी केले.
आदर्श
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे व उमेदवारांच्या खर्चाचे संनियंत्रण
करण्यासाठी सहाय्य करण्याकरिता जिल्ह्यात ११ फिरती पथके व १४ स्थिर सर्वेक्षण पथके
स्थापन करण्यात आली आहेत. आदर्श आचारसंहितेबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ‘सी
व्हीजील’ हे मोबाईल अॅप्लिकेशन भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले असून
नागरिकांना हे अॅप्लिकेशन मोबाईलवर डाऊनलोड करून याद्वारे तक्रार नोंदविता येईल. त्याचबरोबर
जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क कक्ष सुरु करण्यात आला असून १९५० या टोल फ्री
क्रमांकावर संपर्क साधून मतदारांना आपल्याला आवश्यक माहिती प्राप्त करून घेता
येईल. हा टोल फ्री क्रमांक २४ x ७ सुरु राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या ०७२५२-२३२८५२ या क्रमांकावर देखील नागरिकांना आपल्या तक्रारी
नोंदविता येणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यावेळी म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक
दूरचित्रवाणी, आकाशवाणी, चित्ररथ,
डिजिटल वॉल, बल्क मेसेज, सर्व प्रकारच्या सोशल मिडिया या व अन्य सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक,
श्राव्य, दृकश्राव्य माध्यमातून प्रसारित करावयाच्या
सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय
माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) मार्फत हे पूर्व प्रमाणीकरण
करण्यात येणार आहे. तसेच मुद्रित माध्यमातील शेवटच्या दोन दिवसातील जाहिराती सुद्धा
या समितीकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
पेड
न्यूजच्या संबंधातील तक्रारींची, मुद्द्यांची तपासणी करण्याचे काम सुद्धा ही समिती
करणार आहे. पेड न्यूजविषयक तक्रारी व मुद्द्यांची तपासणी करून भारत निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे पेड न्यूजचा वापर
प्रचारासाठी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment